लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना रेल्वे स्थानक परिसरातून विद्युतनगरसह अन्य पाच ते सहा कॉलनीत जाण्यासाठी रेल्वे रूळांची अडचण येत आहे. रेल्वेची संख्या वाढल्याने सरारी दर एक तासाला रेल्वेगेट बंद होत असून, यात प्रवासी गाड्यांसह मालगाड्यांचा यात समावेश आहे. रेल्वेने येथे भुयारी मार्ग उभारावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी उचलून धरली होती. त्यानुसार अडीच कोटी रूपयांचे टेंडरही काढले. परंतु नंतर हे काम त्या भागातून जाणाऱ्या नाल्याचे पाणी उपसण्याच्या मुद्यावरून लांबणीवर पडले आहे.जालना रेल्वेस्थानकजवळील हा प्रश्न आहे. दिवसेंदिवस शहराचा विकास चौफर झाल्याने रेल्वे स्थानकाच्या समोरील भागातील अनेक नवीन कॉलन्यांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे त्या भागातील पाच ते दहा हजार नागरिकांना जालना शहरात येतांना आणि पुन्हा घरी जाण्यासाठी रेल्वे स्थानकाजवळील जुना रस्ता महत्वाचा आहे. परंतु गेल्याा काही वर्षात रेल्वेची ये-जा वाढल्याने दर एक ते अर्धा तासांनी रेल्वे गेट बंद होत आहे. याचा मोठा परिणाम या भागातील वाहतूक ठप्प होण्यावर होत आहे. ही बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे म्हणून त्या भागातील नगरसेवक तसेच रेल्वे संघर्ष समिती आणि नागरिकांनी रेल्वेसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन भुयारी मार्ग मार्गी लावण्याची मागणी केली होती.या मागणीवर बराच खल होऊन निवडणूकीपूर्वी माजी मंत्री अर्जुन खोतकर, आ. कैलास गोरंट्याल यांनी जिल्हाधिका-यांच्या दालनात रेल्वेतील अधिका-यांना बोलावून बैठक घेतली होती. त्यावेळी पालिकेने या भागातील नाल्याचे जे पाणी आहे, ते इतरत्र वळवणे शक्य नाही. परंतु एक मोठा हौद बांधून त्यात या नाल्याचे पाणी सोडून नंतर ते पंपव्दारे ते उचलून इतरत्र वळवणे हाच पर्याय असल्याचा मुद्दा पालिकेचे अभियंता सौद यांनी मांडला होता. परंतु नंतर या मुद्याकडे रेल्वे प्रशासनाने गंभीरतेने न घेतल्याने अडचण कायम असल्याचे चित्र आहे. या संदर्भात रेल्वेतील अधिका-यांशी संपर्क केला असता, आम्हाला असा कुठलाच लेखी प्रस्ताव मिळाला नसल्याचे सांगितले.
जालन्यातील भुयारी मार्गाचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:25 AM