- संजय देशमुख (जालना)
जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळींच्या भावात अचानक तेजी आल्याने शेतकऱ्यांना चांगले दर मिळत आहेत. असे असले तरी ही तेजी फार दिवस टिकणार नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. साखरेचा कोटा केंद्र सरकारने जाहीर केला असून, तो २२ लाख मेट्रिक टन आहे. दिवाळी संपताच साखरेच्या दरात ५० रुपयांची घसरण झाली.
पावसाने हुलकावणी दिल्याने यंदा जालना बाजारपेठेत मूग, तूर तसेच उडदीची पाहिजे तशी आवक आलेली नाही. याचा परिणाम डाळींच्या भाववाढीवर झाल्याचे सांगण्यात आले. तूर, हरभरा डाळीत प्रतिक्विंटल ४०० ते ५०० रुपयांची तेजी आली आहे. मागणीच्या तुलनेत डाळींची आवक कमी झाल्याने हे भाव वाढले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये प्रथमच तेजी आल्याचे दिसून आले. दिवाळी संपल्यावर बाजारातील ग्राहकीही कमी झाली आहे.
शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कापूस खरेदीला खासगी बाजारात प्रारंभ झाला आहे. मात्र, पाहिजे तेवढा दर मिळत नसल्याने आजही जालन्यातील कापूस गुजरातकडे जात आहे. तेथील व्यापारी थेट गावात गाडी आणून कापूस जागेवर खरेदी करीत असल्याने शेतकरी थोडा कमी भाव मिळत असला, तरी तो रोखीने मिळत असल्याने व्यापाऱ्यांना कापूस विक्री करीत असल्याचे चित्र आहे. जालना बाजारपेठेत सध्या सोयाबीनची आवक ही ५०० हजार क्विंटलपेक्षा जास्त असून, यातही क्विंटलमागे चांगल्या सोयाबीनला ३३०० रुपयांचा भाव मिळत आहे.
ज्वारीदेखील बऱ्यापैकी येत असली तरी त्याचे भाव गेल्या आठवड्यातीलच कायम आहेत. नवीन गुळाची आवक आता सुरू झाली असून, कोल्हापूर, लातूर तसेच शेजारील विदर्भातून गुळाची आवक येत आहे. शासनाने सुरू केलेल्या हमीभाव केंद्रावर मात्र शेतकरी फिरकत नसल्याचे चित्र आहे. दिवाळी संपल्यानंतर आता व्यापाऱ्यांना ग्राहकांची चिंता सतावत असल्याचे बोलले जात आहे. मोसंबीची आवक बऱ्यापैकी असली तरी शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही.