तीर्थपुरी (जालना) : काही कारखानदारांनी कारखान्याचा मूळ उद्देश बाजूला ठेवून राजकीय स्वार्थासाठी कारखान्याचा वापर केला. शेतकऱ्यांनी आता हे डावपेच ओळखून साखर कारखान्यांचा राजकीय वापर होऊ देऊ नये, राजकीय दडपशाही सहन करू नये. असे आवाहन समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी घनसावंगी, अंबड तालुक्यातील ऊस उत्पादकांना केले. तीर्थपुरी येथील शिवतीर्थ मंगल कार्यालयात गुरुवारी सांयकाळी समृद्धी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते.
समृद्धी कारखान्याने शेतकरी सभासदांच्या मुलीच्या लग्नासाठी एक क्विंटल साखर मोफत देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना साखर कार्डचे वाटप त्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. पुढे बोलताना घाटगे म्हणाले की, कोणतेही राजकीय ध्येय नसताना कारखाना उभा करण्याचे काम करत असताना अनेक अडचणी आल्या होत्या. तरीही न डगमगता केवळ शेतकऱ्यांसाठी लढलो. आणि कारखाना उभा करून दाखवला. दुसरीकडे प्रस्थापितांनी कारखान्याचा उपयोग राजकीय स्वार्थासाठी करत शेतकऱ्यांवर दडपशाही केली. यापुढे शेतकऱ्यांनी हे खपवुन घ्यायला नको. कारण ऊस उत्पादक हा कारखान्यासाठी देवा समान असतो. त्याचा सन्मान झालाच पाहिजे. यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यंदा अतिरक्त उसाचा प्रश्न निर्माण होणार नाहीकारखान्याची गाळप क्षमता अडीच हजारावरून पाच हजार टन करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अतिरिक्त उसाची अडचण राहणार नाही. कारखान्याच्या सभासदांसाठी दिवाळी, दसऱ्यासाठी घरपोच साखर दिली जाईल. मागील वर्षीच्या झालेल्या गळीत हंगामाचे वाढीव बिल येणाऱ्या सण, उत्सवात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील. असेही त्यांनी सांगितले.
भाजपाचे घनसावंगी तालुकाध्यक्ष शिवाजी बोबडे यांनी प्रस्ताविक करताना समृद्धी कारखान्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची उसाची अडचण दूर झाली असून, कारखान्याला मोठ्या प्रमाणात ऊस पुरवला जाईल. अशी ग्वाही शेतकऱ्यांच्यावतीने दिली. या मेळाव्यास कारखान्याचे व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी, शिवाजी बोबडे, भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश बोबडे, सचिन चिमणे, रमेश बोबडे, रामप्रसाद बोबडे, महादेव चिमणे, राम परदेशी, लक्ष्मण उढाण, पुरुषोत्तम उढाण, बाळासाहेब उबाळे, दीपक बोबडे, अशोक खोजे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती.