जालना : कोरोना बाधितांची संख्या घटली असली तरी जिल्ह्यातील कोरोना संशयितांच्या तपासण्या वाढवाव्यात, अशा सूचना पालकमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी रिना बैसये, उपजिल्हाधिकारी अंजली कानडे, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन नार्वेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यामध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या कमी होणार नाही, यादृष्टीने नियोजन करून चाचण्यांची संख्या वाढवावी. लोरिस्क व हायरिस्क सहवासितांचा अचूकपणे शोध घेऊन त्यांच्या चाचण्या कराव्यात. जिल्ह्याचा कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर हा आज कमी असला तरी हा दर भविष्यात वाढू नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
चौकट
मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करा
कोरोनाच्या अनुषंगाने मास्कचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचनाही टोपे यांनी बैठकीत दिल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मास्क वापर, सुरक्षित अंतराचे पालन करण्यासह लसीकरणही महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.