दीपक ढोले
जालना : अनेक संकटांशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांनी कोरोनाचाही मुकाबला सुरू केला आहे. मात्र, असे असले तरी गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील १०५ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे.
नैसर्गिक, सुलतानी संकट, शेतमालाला नसलेला भाव, कर्जाचा डोंगर, अशा अनेक संकटांत सापडलेल्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपला जीवनप्रवास थांबविला आहे. २००१ ते २०२० या काळात चार हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. गेल्या वीस वर्षांच्या काळात शेतकरी आत्महत्या कमी हव्यात, यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या गेल्या. मात्र, यातील किती योजनांचा शेतकऱ्यांना थेट लाभ झाला, यावर वादविवाद सुरूच आहे. असे असले तरी शेतकऱ्यांमागे लागलेले समस्यांचे शुक्लकाष्ट काही संपलेले नाही. कधी अस्मानी, तर कधी सुलतानी अशा संकटात शेतकरी कायमच अडकलेला आहे. यंदा तर कोरोनाच्या संकटातही शेतकरीच अधिक भरडला जात आहे.
कोरोनामुळे शेतकरी अडचणीत
रबी हंगामात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना या काळातील पीक एकतर कवडीमोल भावाने विकण्याची, तर काहींवर अक्षरश: फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी या काळातही अडचणीत आला आहे. देशात लॉकडाऊन असताना शेतकरी आपल्या शेतातील माल विकावा कसा, या मानसिकतेत होते. यामुळेच मागील वर्षभरापासून जिल्ह्यातील १०५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
१०५ पैकी ९० शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळाला लाभ
जिल्ह्यात वर्षभरात १०५ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे एक लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते. वर्षभरात १०५ पैकी ९० शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
आकडेवारी
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या - १०५
योजनेसाठी पात्र ठरलेले शेतकरी - ९०
आलेख काढावा
मागील आठ महिन्यांत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या
सप्टेंबर
१०
ऑक्टोबर
१४
नोव्हेंबर
०५
डिसेंबर
०७
जानेवारी
०८
फेब्रुवारी
०३
मार्च
०४
एप्रिल
००