जालना: यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी कृषी विभागाने २० कलमी कार्यक्रम आखला आहे. त्याची अंमलबजावणी यशस्वीरित्या करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी कामाला लागले आहे. शेतकऱ्यांची खते, बि-बियाणे व किटकनाशके खरेदी करताना फसवणूक होऊ नये यासाठी कृषी सेवा केंद्रावर कडक नजर राहण्याबरोबरच शेतकऱ्यांना खरीप हंगामात पेरणी पासून ते काढणीपर्यंत पीकनिहाय उत्पादनवाढीच्या सूत्राचे मार्गदर्शन कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी करणार आहेत.
खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर परिणाम करणारा घटक आहे. त्यामुळे त्याचे योग्य नियोजन झाले तरच उत्पादनात वाढ होणार आहे. तालुक्यात सोयाबीनसह कपाशीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. खरीप हंगामातील सोयाबीन आणि इतर पिकांच्या पेऱ्यात उशीर झाला तरी त्याचा उत्पादनावर परिणाम होणार नाही. यावर्षी कापसाला अपेक्षित भाव मिळाला नाही. तरीसुद्धा कापसाच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. त्याचबरोबर कमी कालावधीत अधिकच्या उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या सोयाबिनचा पेराही वाढणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.
काय आहे सुपर-२० कार्यक्रमजालना जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी सर्व तालुक्यास खरीप हंगामाच्या नियोजनासाठी २० कलमी आराखडा आखून दिला आहे. यात प्रामुख्याने बीज उगवण क्षमता तपासणी, बीज प्रक्रिया, कृषी सेवा केंद्रनिहाय कृषी कर्मचारी, अधिकारी यांची नियुक्ती करणे, जमिनीच्या सुपीकता निर्देशांकानुसार खत व्यवस्थापन, पीकनिहाय उत्पादनवाढीची सूत्रे या बाबींचा समावेश आहे. यांत्रिकीकरणावर भर देणारशेती मशागत कामाला हात भार लावण्याकरिता कृषी विभागाने मागील दोन वर्षांत यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. एकट्या जाफराबाद तालुक्यात ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित औजारासाठी ३६४ लाभार्थींना २ कोटी ६४ लाख, सिंचनासाठी (ठिबक व तुषार संच वगळता) २११९ लाभार्थींना ४ कोटी ३६ लाख, फलोत्पादन घटकासाठी २३१ लाभार्थींना १ कोटी ९२ लाख असे एकूण ८ कोटी ९२ कोटींचा निधी वितरित केला आहे.- संतोष गायकवाड, तालुका कृषी अधिकारी.