विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाळा शेवटच्या टप्प्यात असला तरी जालना तालुक्यात मोठा पाऊस झालेला नाही. परिणामी सप्टेंबरच्या अखेरीसही तालुक्यातील ३१ गावांना ४६ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या टँकरद्वारे ९० हजार २२२ ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे.जालना तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ६८६.२० मिमी इतकी आहे. आजवर वार्षिक सरासरीच्या ६२४.७९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असून, तालुक्यात आजवर ४०७.३२ मिमी म्हणजे ५९.३६ मिमी पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने तालुक्यातील प्रकल्पांची तहान कायम आहे. परिणामी ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा प्रश्न आजही कायम आहे. परतीच्या पावसाने तालुकावासियांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र, प्रकल्प भरण्यासारखे मोठे पाऊस अद्यापही झालेले नाहीत. परिणामी जिल्ह्यातील ३१ गावांना व ८ वाड्यांना ४५ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. तर टँकरसाठी ३१ अधिग्रहणे व इतर गावांसाठी ३ अधिग्रहणे अशी एकूण ३४ अधिग्रहणे तालुक्यातील गावा-गावात करण्यात आली आहेत. तालुक्यातील नेर, सारवाडी शेवगा, पिरकल्याण, मानेगाव खालसा, उटवद, हास्ते पिंपळगाव, घेंटुळी, पारेगाव, नंदापूर, पिंपरी डुकरी, टाकरवन, हिवरा रोषणगाव, कोळवाडी, हिवर्डा, बठाण, एरंडवडगाव, चितळी पुतळी, वडगाव, दरेगाव, साळेगाव नेर, वाघु्रळ जहागीर, लोंठेवाढी, कुंबेफळ सिंदखेड या गावांसह वाड्यांना टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे.केवळ एक शासकीय टँकरतालुक्यात मंजूर असलेल्या ४६ पैकी केवळ १ शासकीय टँकर पाणीपुरवठ्यासाठी धावत आहे. इतर सर्व टँकर खासगी आहेत. त्यात मंजूर १२३ पैकी केवळ ६६ खेपा होत आहेत. तर ५७ खेपा कमी होत आहेत. सरासरी हे प्रमाण असून, पाण्याची टंचाई, विजेचा प्रश्न, इतर तांत्रिक अडचणींमुळे या खेपा कमी होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.ग्रामीण भागातील अवस्था बिकटजालना शहरासह ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अनेक गावातून टँकर, अधिग्रहणाची मागणी प्रशासनाकडे केली जात आहे. तर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चातून, स्वत:च्या शेतातून गावा-गावाला पाणीपुरवठा केला आहे.
९० हजार ग्रामस्थांना ४६ टँकरचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 11:11 PM