जालना : शहरातील बांधकाम व्यावसायिक अंकित अभयकुमार आबड हे त्यांच्या मंठा मार्गावरील शेतात जात असताना सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान ४० ते ५० जणांनी कार अडवून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. याच मारहाणीतून वाचून पळून जात असताना गोळीबार करण्यात आल्याची तक्रार आबड यांनी तालुका जालना पोलीस ठाण्यात केली. यावरून संशयित १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून आबड आणि अन्य नागरिकांमध्ये मंठा मार्गावरील डी-मार्टच्या पाठीमागील शेताच्या वादातून हाणामारी झाली आहे. याप्रकरणी सलग तीनवेळेस संशयितांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता; परंतु त्यानंतरही काहीच फरक पडला नसल्याचा गंभीर आरोप आबड यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना केला.
सोमवारी नेहमीप्रमाणे शेतात जात असताना डी-मार्टच्या पाठीमागील जंगलात दबा धरून बसलेल्या ४० ते ५० जणांनी अचानक माझी कार अडवून तलवारीने हल्ला करून मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला; परंतु गतीने कार चालवून मी सुटका करून घेतली. त्यातील काहीजणांनी कारवर गोळीबार केला. ही घटना घडल्यावर आपण पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांची भेट घेऊन सर्व हकीकत सांगितली. यावरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे आबड म्हणाले. दीपक काकडे, इब्राहिम परसुवाले, फारूक टुंडीवाले, लखन मिसाळ, कपिल खरात, चंदन मोटवानी, राजेंद्र डागा, श्रीकांत ताडेपकर, किरण घुले, मिनष बगडिया, शरद डोळसे, रोशन डागा, नीलेश भिंगारे, सचिन मुळे या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोळीबार झाला की, नाही...गेल्या काही महिन्यांपासून डी-मार्टच्या पाठीमागील सर्वेक्षण क्रमांक ५५४ मध्ये असलेल्या जमिनीचा वाद सुरू आहे. या वादातून या आधीदेखील वाद झाला होता. त्यावेळीदेखील आबड यांनी तक्रार देऊन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यातच सोमवारी या जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याचे नमूद केले; परंतु यात गोळीबार झाला असेल तर ती रिव्हॉल्व्हर कुठून आली. तसेच अंकित आबडच्या कारवर गोळीबार झाला का? आदी मुद्दे उपस्थित झाले आहेत.