जालना : मंडल अधिकारी तसेच तलाठ्यांच्या पथकावर जीवघेणा हल्ला करणारा संशयित आरोपी पळून जाणे संशयास्पद आहे. यात पोलिसांचाच अप्रत्यक्षपणे हात असल्याचा गंभीर आरोप तलाठी संघटनेने शुक्रवारी झालेल्या त्यांच्या बैठकीत केला आहे.
जालन्यात मंगळवारी रात्री शहरातील मोतीबागेजळ गस्तीवर असलेल्या दोन मंडळ अधिकारी आणि दोन तलाठी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यांच्या कारला वाळू वाहून नेणाऱ्या हायवाने शंभर मीटरपर्यंत फरफटत नेले होते. तलावाजवळ बांधलेल्या कठड्यांमुळे हे चारहीजण बचावल्याचे होते. या प्रकरणात संशयित आरोपी गणेश काकडे याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. काकडे याला त्याच्या घरून हायवा आणि स्काॅर्पिओची चावी आणण्यासाठी नेले असताना काकडे पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला. हे सर्व संशयास्पद असून यात अप्रत्यक्षपणे पोलिसांचा हात असल्याचा गंभीर आरोप तलाठी संघटनेच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत करण्यात आला.
गौण खनिजाची चोरी रोखणारगस्त घालताना शस्त्रधारी पोलीस सोबत असल्यास गौण खनिजाची चोरी रोखणार असल्याचे संघटनेने म्हटले. या बैठकीस महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे जालना तालुकाध्यक्ष बाळकृष्ण कळकुटे, सचिव एन. के. कुलकर्णी, बी. एम. मोरे, पी. डी. ठाकरे, व्ही. एस. लोखंडे, एम. जी. सोनवणे, इंदरराव सरोदे, भोरे, हरि गिरी, दुर्गेश गिरी यांच्यासह अन्य तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
त्या पोलिसांची चौकशीसंशयित आरोपी गणेश काकडे यांना घरी नेल्यावर तो पोलिसांच्या तावडीतून पळून गेला. याप्रकरणी संबंधित दोन पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या आरोपीला सोबत नेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे वाहनही अवैध वाळू वाहतुकीत असल्याची जोरदार चर्चा तलाठी संघटनेच्या बैठकीत करण्यात आली. त्यामुळे हे सर्व प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.