वडीगोद्री (जालना): मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या मागणीवरुन सत्ताधारी पक्षांना इशारा दिला आहे. सरकारने आरक्षणाबाबतच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आपण विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार उभे करु आणि महायुतीच्या उमेदवारांचा पराभव करु, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजी राजे हे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी येथे आले होते. त्यांच्यात तीन तास चर्चा झाली. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगे भेटीत काय चर्चा झाली हे सांगितले.
"मनोज जरांगेंची तब्येत बिघडल्यानं इथं आलो होतो. या भेटीत राजकीय चर्चा झाली आहे. मनोज जरांगे यांचं कौतुक करावसं वाटलं होतं. अनेक वर्षांपासून मनोज जरांगे यांना ओळखतो. जरांगे यांना नेहमी सपोर्ट करण्याची भूमिका आहे. वेळ भरपूर होता त्यामुळं चांगली चर्चा झाली आहे. एक मोठं एवढं साम्राज्य उभं केलं म्हणून शाबासकी देण्यासाठी आलो आहे. मनमोकळ्या मनाने चर्चा झाली आणि मला त्यांनी तब्येतीची काळजी घेणार असा शब्द दिला आहे," असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं.
बहुतांश सगळ्या मागण्या सारख्या आहेत. सरकरनं स्पष्ट बोलायला पाहिजे होतं की दहा टक्के आरक्षण कसं टिकणार तीन तास बसून चांगली चर्चा झालीये. सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत. शेवटी २९ तारखेला तेच भूमिका स्पष्ट करणार आहेत. सगळे आपआपलं स्वतंत्र आहेत. मनोज जरांगे पाटील यांचा दृष्टीकोण अन् आमचं उदिष्ट्य एक त्यामुळे आम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एकत्र येऊन लढा द्यायचा की नाही याबाबत प्राथमिक सकारात्मक चर्चा झाली आहे, असेही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
सरकार विरोधात जरांगे पाटील बोलायला खंबीर आहेत. राजू शेट्टी यांची अजून भेट झाली नाही. ते आमच्याच कोल्हापूरचे आहेत असेही संभाजीराजे छत्रपती म्हणाले. संभाजीराजेंच्या भेटीवर बोलताना जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा आणि राजकारणाचा भाग वेगळा असल्याचे म्हटलं आहे.
"थोडी फार चर्चा झाली आहे. गादीचा सन्मान करत आलो आहोत. राजकारणात काही गोष्टी सांगायच्या नसतात हे शिकलो आहे आंदोलनाचा आणि राजकारणाचा भाग वेगवेगळा आहे. जर २९ तारखेला ठरलं तर गरजवंत समाजाच्या प्रश्नाकरिता लढा असणार आहे. समीकरणं बघतोय कसं चाललंय. मला समाजाचा विचार घ्यायचा आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावायचे मला न्याय द्यायचा आहे. समाज मालक आहे समाजाला विचारून निर्णय घ्यायचा आहे," असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.