वडीगोद्री (जि. जालना) : चाकूचा धाक दाखवून आणि दगडफेक करीत दरोडेखोरांनी एका घरातील तब्बल ४० तोळे सोन्यासह दीड लाखाची रोकड लंपास केली. ही खळबळजनक घटना अंबड तालुक्यातील वडीगोद्री (जि. जालना) शिवारात गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडली.
वडीगोद्री येथील श्रीमंत तुकाराम खटके यांचे औरंगाबाद- बिड राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यालगत घर आहे. दिवाळी सणासाठी त्यांच्या दोन मुलीही घरी आल्या होत्या. खटके कुटुंबिय बुधवारी रात्री घरात झोपले होते. गुरूवारी पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांनी शेजारील घराला बाहेरून कड्या लावून खटके यांच्या घरात प्रवेश केला. खटके कुटुंबियांना चाकूचा धाक दाखवून धाक दाखविला. त्याचवेळी दरोडेखोरांच्या नजरा चुकवून राजेंद्र खटके व विष्णूदास खटके हे किचन रूमचे दरवाजे उघडून बाहेर आले. मात्र, बाहेर आलेल्या दोन दरोडेखोरांनी त्यांच्यावर दगडफेक सुरू केली. तोपर्यंत घरातील तीन दरोडेखोरांनी गंगुबाई साहेबराव आटोळे यांनाही चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने तसेच कपाटातील दागिने असे जवळपास ४० तोळे सोन्याचे दागिने आणि एक लाख ४२ हजार रूपये, कागदपत्रे घेऊन दरोडेखोरांनी उसाच्या शेतातून पळ काढला.
कागदपत्रे फेकली उसाच्या फडातघटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी उसाच्या फडाला घेरा घातला. तसेच परिसरात नाकाबंदी करून दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरोडेखोर पोबारा झाले होते. घरातून चोरलेली कागदपत्रे उसाच्या फडात आढळून आली. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्यासह गुन्हे शाखा, गोंदी, अंबड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. घटनास्थळी दाखल श्वानाने उसाच्या शेतापर्यंत अर्धा किलोमीटर माग काढला.
आरोपींचा शोध सुरूघटनास्थळाची पाहणी केली असून, संशयितांकडेही चौकशी केली जात आहे. पथकामार्फत या घटनेचा तपास सुरू असून, लवकरच आरोपींना जेरबंद केले जाईल.- विक्रांत देशमुख, अपर पोलीस अधीक्षक, जालना