- फकिरा देशमुखभोकरदन (जालना): तालुक्यातील सुरंगळी येथील सपकाळ या शेतकरी कुटुंबाने जांभूळ बाग लागवडीचा प्रयोग यशस्वी करून विक्रमी उत्पादन घेतले आहे. तीन एकरातील केवळ 150 झाडातून सपकाळ कुटूंबाला तब्बल 30 लाख रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. या जांभळाचा गोडवा राज्यभर पसरला असून वाढती मागणी आहे. केवळ जाभळाच्या उत्पादनातून शेतकऱ्याची आर्थिक प्रगतीकडे वाटचाल पंचक्रोशीत कौतुकाचा विषय ठरत आहे.
भोकरदनपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या सुरंगळी येथील कौतिकराव विठ्ठल सपकाळ आणि त्यांच्या भावंडांनी २००८ मध्ये बारामती येथील जांभळाची रोपे आणली. २० बाय ३० या अंतरावर तीन एकरांत त्यांची लागवड केली. त्यावेळी अनेकांनी या जांभूळ बागेवर प्रश्न उपस्थित केले. मात्र, सपकाळ कुटुंबाने विविध अडचणींवर मात करून बागेची जोपासना केली. बाग वाचविण्यासाठी पाणीटंचाई निर्माण झाल्याने सपकाळ कुटुंबाने २०१६ मध्ये तीन किलोमीटर अंतरावरील जुई धरणात विहीर खोडून पाईपलाईनद्वारे शेतात पाणी आणले. बाग जगली मात्र जांभळातून उत्पादन कमी असल्याची सल्ले देत अनेकांनी सपकाळ कुटूंबाला वेड्यात काढले.
दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून या जांभूळ बागेने सपकाळ कुटूंबाचा कायापालट केला आहे. या बागेतून पंधरा ते विस दिवसांपासून उत्पादन सुरू झाले आहे. दररोज 10 क्विंटल जांभूळ अमरावती, पुणे, औरंगाबाद, जालना आदी ठिकाणच्या बाजारपेठत विक्रीसाठी जात आहेत. हे जांभूळ चविष्ट व दर्जेदार असल्याने ग्राहकातून अल्पवधीत मागणी वाढली. त्यामुळे व्यापारी या जांभळाची खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत.
निव्वळ नफा २५ लाख मिळेल आत्तापर्यंत बागेची पाच वेळा हार्वेस्टिंग करण्यात आली असून 13 ते 14 लाखाचे उत्पादन हातात आले आहे. आणखी पंधरा ते पंचवीस दिवस या बागेतून उत्पादन मिळणार आहे. त्यामुळे एकूण 30 ते 32 लाख रुपये उत्पादन या वर्षी मिळेल. त्यातून पाच लाख रुपये खर्च वजा केला सात निव्वळ नफा 25 लाख मिळेल. फवारणीपासून ते खताची मात्रा कोणती द्यावी याबाबत योगेश जाधव यांनी त्यांना मदत केली. त्यामुळे फळांचे वजन २५ ते ३० ग्रॅमपर्यंत आले आहे. - कौतीक विठ्ठल सपकाळ, प्रगतीशील शेतकरी
मजुरांना रोजगार मिळालासपकाळ यांच्या जांभुळ बागेमुळे सुरंगळी, कल्याणी परिसरातील 25 ते 30 मजुरांना एक महिनाभर जांभूळ तोडण्यासाठी काम मिळाले आहे. सपकाळ कुटुंबातील सदस्यांनी जांभूळ बागेतून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. जांभूळापासून ज्युस, बियापासून पावडर तयार सुद्धा करता येते. त्याला सुद्धा चांगली मागणी आहे. - रामेश्वर भुते, तालुका कृषी अधिकारी