लोकमत न्यूज नेटवर्कराणीउंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव या गावाची निवड नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेमध्ये झाली असून, या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे घनसावंगी तालुका कृषी विभागाचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी एस. बी. ढगे यांनी राणीउंचेगाव येथे आयोजित ग्रामसभेत शेतक-यांना सांगितले.जालना जिल्ह्यातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनमध्ये ३६३ गावांची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये घनसावंगी तालुक्यामध्ये ४८ गावांची निवड झालेली आहे.तालुक्यातील ११ गावामध्ये पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये राणीउंचेगावची निवड झालेली आहे.नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये गावक-यांचा सहभाग महत्वाचा आहे. या योजनेमध्ये जलसंधारणाची १०० टक्के कामे अनुदानावर करण्यात येणार आहे. तर वैयक्तिक लाभाची ५० ते ६० टक्के कामे अनुदानावर करता येणार आहे.नाला सरळीकरण, शेततळे पन्नीसह, सिमेंट बंधारे, जमीन सुधारणाची कामे, तर वैयक्तिक लाभाच्या कामामध्ये विहीर, डिझेल इंजीन, पाईप, तुषार सिंचन, शेतमालाची वाहतूक करण्यासाठी वाहन, शेतमालाच्या साठवणुकीसाठी गोदामे, शेळीपालन, कुक्कूटपालन तसेच फळबाग लागवड करणे ही कामे करता येणार आहेत. गावामधील शेतमजूर, भूमिहीन व्यक्ती, महिला बचत गटांना कृषी उद्योगात्मक व्यवसाय करण्यासाठी निधी देण्यात येणार आहे. तसेच अपंग व्यक्तींना या प्रकल्पामध्ये लाभ देण्यात येणार असल्याचे प्रकल्प तंत्र सहाय्यक शेंडगे यांनी सांगितले.यावेळी प्रभारी तालुका कृषी अधिकारी एस. बी. ढगे, सरपंच विठ्ठल खैरे, बालासाहेब शिंदे, ग्रामविकास मंदोडे, अप्पासाहेब शेंडगे, प्रकल्प सहाय्यक मिलींद गवई, कैलास शेळके, मारोती मंगडे, अब्दूल रईस, लक्ष्मण रईस, लक्ष्मण काटे, शिवाजी डवणे, सत्यनारायण शिंदे, जगन जाधव यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
कृषी संजीवनी योजनेचा लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 1:13 AM