गेल्या काही महिन्यांमध्ये जालना ते औरंगाबाद मार्गावर अनेक अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांचा आधार हरपला आहे. दोन दिवसांपूर्वी एका कंटेनरने दोन युवकांना चिरडले. त्यातील दाेन्ही तरुण हे गरीब घरातील होते. काम-धंदा करून उदरनिर्वाह करत; परंतु अपघातात त्यांचा बळी गेल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे.
ही बाब गंभीर असून, याची दखल युवा सेनेचे राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकरांनी घेतली.
त्यांनी बुधवारी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे तसेच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी तातडीने याची दखल घेऊन आयआरबी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सूचना दिल्या. त्यात प्रामुख्याने जालना ते औरंगाबाद मार्गावरील खड्डे तातडीने बुजविणे, अनेक महत्त्वपूर्ण वळणांवर सीसीटीव्हीचे कॅमेरे बसविणे, पोलिसांची पेट्रोलिंग वाढविणे, आदी सूचना दिल्या. तसेच या सचूनांची अंमलबजावणी तातडीने करण्याचे निर्देशही दिले.
आमचे कार्यकर्ते हळहळले
जालना तालुक्यातील दावलवाडी येथील दोन युवक हे मोटारसायकलवरून गावाकडे जात असताना एका कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात त्या दोघांचा मृत्यू झाला. ते युवा सेनेचे कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. ही बाब मनाला न पटल्याने आपण तातडीने युवासेनेचे संस्थापक तथा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली. त्यांनी लगेचच याची दखल घेतल्याने आता अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल.
अभिमन्यू खोतकर, युवा सेनेचे राज्य विस्तारक