लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महामार्गासह ग्रामीण मार्गावरील रस्ते अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, रस्ता सुरक्षा सप्ताहात सर्व विभागांनी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्या.जालना येथे शनिवारी संसद क्षेत्रीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. रस्ता अपघात कमी करण्यासाठी करण्यात येणा-या उपायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आरोग्य विभाग, पोलीस विभाग, शिक्षण विभागासह इतर सुरक्षा यंत्रणांनी रस्ता सुरक्षा दृष्टीकोनातून आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी, अशा सूचना देण्यात आल्या. बैठकपूर्वी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘हेल्मेट सेल्फी पॉइंट’ या अभिनवपूर्ण उपक्रमाचे अनावरण करण्यात आले. बैठकीनंतर ‘रस्ता सुरक्षा अभियान-२०२०’साठी तयार करण्यात आलेले सुरक्षा पत्रक, स्टिकर्सचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. यावेळी सर्व उपविभागीय अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम.के.राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पालिकेच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.यावेळी केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी अपघात रोखण्यासाठी रस्ते विकास कामात अंडरपास मार्ग, जंक्शन सुधारणासह इतर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. तसेच वाहतूक नियमांचे पालन व्हावे, याबाबतही जनजागृती उपक्रम राबविण्याचे सूचित करण्यात आले.
रस्ते अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:32 AM