लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुष्काळाने जनता हैराण आहे. त्यातच पाणीटंचाईचे भूत डोक्यावर बसले आहे. यामुळे प्रशासनही हवालदिल झाले आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करणे, विहीर अधिग्रहण करणे आदी उपाय करूनही टंचाई कायम आहे. ग्रामीण भागाप्रमाणेच जालना शहरातील पाणीबाणी निर्माण झाली आहे. नवीन जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी तलावाने तळ गाठला आहे. तर जायकवाडीतून येणाऱ्या पाण्याचे नियोजन करताना पालिकेचे नाकी नऊ येत आहेत.जालना शहरात काही भागात येणारा पाणीपुरवठा हा नियमितपणे होत नसल्याचे नागरिकांनी थेट पालिकेत जाऊन सांगितले. कुठलीही एक ठराविक वेळ आणि ठराविक वार पाणीपुरवठ्यासाठी निश्चित करण्याची गरजही यावेळी व्यक्त केली. मुख्याधिकाऱ्यांनाही या संदर्भात निवेदन देण्यात आले. जुना जालना भागातील भाग्यनगरमध्ये पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा न झाल्याची माहिती या भागातील नागरिक खंदारकर यांनी दिली. तसेच याभागातील हातपंपही आटल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.एक हजार लिटरचे एक टँकर हे सरासरी ३०० रूपयांना विक्री होत आहे. त्यातही त्या पाण्याच्या शुध्दतेवर प्रश्न कायम आहेत.ग्रामीण भागातील पाणी टंचाईने आता रौद्र रूप धारण केले आहे. मार्च संपण्यापूर्वीच टँकरच्या संख्यने ३२५ चा आकडा पार केला आहे. ज्या विहिरींना पाणी आहे,त्या विहिरी अधिग्रहित करून त्यावरून टँकर भरण्यासह ग्रामस्थांना पाणी देण्याची व्यवस्था केली जात आहे.सर्व भिस्त घाणेवाडी जलाशयावरजालना शहराला पूर्वी घाणेवाडी जलाशयातून नवीन जालना भागाला पाणीपुरवठा करता येत होता. मात्र, आता या तलावाने तळ गाठला आहे. त्यामुळे या तलावातून आता पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे आता संपूर्ण जालना शहराची भिस्त ही पूर्णपणे जायकवाडीतून होणा-या पाण्यावर अवंलबून आहे. त्यामुळे आता पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना पालिका प्रशासनाचा कस लागणार आहे. असे असले तरी, नागरिकांनी घाबरून न जाता, आम्ही नीट व्यवस्थापन करून आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा करण्या संदर्भात नियोजन करणार आहोत.- संगीता गोरंट्याल, नगराध्यक्षा
टँकरने गाठला सव्वातीनशेचा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:17 AM