जालना : शहरातील सेवाकर कार्यालयातील राज्य कर अधिकाऱ्यास १० हजाराची लाच घेतांना लाच लुचपत विभागाने आज अटक केली. प्रदिप सदाशिव देशमुख (३९, रा.परभणी) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. दरम्यान, लाच लुचपत विभागाने या महिन्यातच ४ अधिकाऱ्यांना लाच घेतांना अटक केली आहे.
जालना शहरातील तक्रारदाराने टॅक्स न भरल्याने कर अधिकारी देखमुख यांनी तक्रारदाराचे बँक खाते सिल करण्याबाबत बँकेला पत्र दिले. त्यानंतर तक्रारदारांनी टॅक्स भरुन सीए मार्फेत पावत्या कर अधिकारी देशमुख यांना देवून सिल केलेले खाते रिलीज करण्याची विनंती केली. परंतु, देशमुख म्हणाले की, टॅक्स उशीराने भरल्यामुळे तक्रारदारास मोठ्या प्रमाणात दंड करण्याचे अधिकार असल्याचे सांगून १५ हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली. याबाबत सीए यांनी तक्रारदारास सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांनी देशमुख यांना फोन लावून विचारणा केली असता, त्यांनी तक्रारदार यांना प्रत्यक्ष भेटण्यास बोलावले, पैसे दिल्याशिवा रिलीज करण्याचे पत्र देणार नसल्याचे कर अधिकारी देशमुख यांनी सांगितले.
यानंतर तक्रारदारने लाच लुचपत विभागाकडे याची तक्रार केली. या तक्रारी वरुन मंगळवारी देशमुख यांच्या लाचेच्या मागणी पडताळणी केली असता, त्यांनी लाच स्विकारल्याचे निषन्न झाले. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकरी, अपर पोलीस अधीक्षक जिरगे, पोलीस उपअधीक्षक निकाळजे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.आ.वि. काशिद, पोनि. चव्हाण, कर्मचारी टेहरे, संतोष धायडे, प्रदीप दौंडे, संदीप लव्हारे, संजय उदगीरकर, महेंद्र सोनवणे, गंभीर पाटील, रामचंद्र कुदर यांनी केली.