लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील मोंढा मार्गावर असलेल्या शिक्षक कॉलनीतील एका शिक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी ४० हजार रोख आणि १५ हजारांचे दागिने असा ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शनिवारी रात्री घडली. गेल्या आठवड्यात झालेल्या ११ लाखांच्या घरफोडीचा तपास अद्यापही लागला नसतांना पुन्हा चोरी झाल्याने चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.शिक्षक कॉलनी येथील मदन विष्णू गिते हे कुुटुंबियासह भाचीच्या लग्नासाठी अकोला येथे गेले होते. लग्न समारंभ आटोपून शनिवारी रात्री शिक्षक मदन गिते यांचा लहान भाऊ बाळासाहेब विष्णू गिते हे जालना येथे परत आले. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास शिक्षक कॉलनी येथील घरी आले असता, त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडल्याले दिसले. घरातील पहिल्या मजल्यावरील खोलीतील कपाट तोडून त्यातील रोख रक्कम आणि दागिने चोरुन नेल्याची आढळून आले. याची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाले, पोलीस कर्मचारी अनिल काळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. बाळासाहेब गिते यांच्या फिर्यादीवरुन रविवारी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पहिल्या चोरीचा अद्यापही तपास नाहीमोंढा नाका परिसरात असलेल्या महेश नगर येथील कैलास संजय सोमाणी यांच्या घरी दहा दिवसांपूर्वीच चोरट्यांनी चोरी करुन तब्बल ११ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. या चोरीचा अद्यापही पोलिसांना छळा लावता आलेला नाही. याकडे पोलीस अधीक्षक लक्ष देतील का ? अशी विचारणा परिसरातील नागरिक करत आहेत.
शिक्षक कॉलनीत धाडसी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 12:26 AM