लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जिल्हा परिषद शाळेतील मुलांनाही तंत्रज्ञानाधारित शिक्षण नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून कसे देता येईल, यासाठी शिक्षकांनी ‘कहूत’ व ‘स्काईप’ यांसह इतर तंत्राचा दैनंदिन अध्यापनात जास्तीत- जास्त उपयोग करावा, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता स्मिता कापसे यांनी केले.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली व डायट प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे व शिक्षणाधिकारी प्रा. कैलास दातखिळ यांच्या नियोजनानुसार अंबड तालुक्यातील शिक्षकांसाठी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय येथे पाच दिवशीय निष्ठा प्रशिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. याचा समारोप शुक्रवारी झाला. यावेळी गटशिक्षणाधिकारी विपुल भागवत, केंद्रप्रमुख आर. एम. फटाले, आर. एस. बांगर, आर. आय. शेख, विषय सहायक संतोष मुसळे, साधन व्यक्ती सतीश देशमुख, अशोक पवार, कचरु शिंदे, सतीश मेहेत्रे, विष्णू राठोड, कविता गव्हाड यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना कापसे म्हणाल्या, आज प्रत्येक पालकाजवळ स्मार्ट फोन आहे. यात मुलांच्या गुणवत्तेसाठी उपयुक्त असे विविध शैक्षणिक अॅप्स उपलब्ध आहेत. पालकांनी ते डाउनलोड करून मुलांना त्यातील घटक शिकविले तर ते ज्ञान चिरकाल मुलांच्या स्मरणात राहिल. ‘कहूत’ हे एक आॅनलाईन पोर्टल आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ सारखी प्रश्न यातून मुलांना विचारले जावू शकतात. ज्यामुळे मुलांच्या उपजत सृनशीलतेला चालना देण्यासोबतच शिक्षकांनी वर्गात शिकविलेल्या पाठ्यघटकांचे मूल्यांकन करण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी घेण्यासाठी याचा उपयोग होतो. असेही स्मिता कापसे यांनी यावेळी सांगितले.‘कहूत’चा डेमो नितीन रोहकले व साधन व्यक्ती सतीश म्हेत्रे यांनी करून दाखविला. नीता आरसुळे यांनी स्काईप कॉन्फरन्सचे नियोजन करून प्रशिक्षणार्थींना पोतुर्गाल येथील एज्युकेटर मॅन्यूइला कोरेआ यांच्याशी प्लॅस्टिक प्रदूषणाचा धोका याविषयी प्रशिक्षण वर्गास मार्गदर्शन केले. यात केंद्रप्रमुख सोनुने यांनी शिक्षण आधारित प्रश्न विचारून संवाद साधला. तत्पूर्वी ‘कहूत’ व ‘स्काईप’ या वेबपोर्टलचे प्रात्यक्षिक सर्व प्रशिक्षणार्थींनी केले.
शिक्षकांनी अध्यापनात तंत्राचा उपयोग करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 1:22 AM