जालना : बालिकेवर लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषी आरोपी मोतीराम गोरे (५०) यास मंगळवारी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश अनघा रोटे यांनी बलात्कार प्रकरणात दहा वर्ष, बाललैंगिक अत्याचार प्रकरणात सात वर्ष व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. घनसावंगी तालुक्यातील गुरुपिंप्री येथे मार्च २०१४ मध्ये ही घटना घडली होती.
पीडित मुलगी अंगणात खेळत असताना शेजारी राहणाऱ्या आरोपीने तिला हाक मारून घरात बोलावून अत्याचार केला होता. पीडित मुलीने घरी जाऊन घडला प्रकार आईला सांगितला होता. नातेवाइकांनी घनसावंगी पोलीस ठाण्यात येवून आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी जी.एस. पाटील, एस. जी. थोरात, एस. एस. गायकवाड यांनी वैद्यकीय प्रमाणपत्रासह न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. सरकारी पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित मुलगी, तिची आई, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच, डॉक्टर व तपास अधिका-यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. न्यायालयाने सरकारी पक्षाच्या युक्तिवाद लक्षात घेता आरोपीला वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील विपुल देशपांडे, अतिरिक्त सरकारी वकील भारत खांडेकर यांनी काम पाहिले.