जालना : जबरी चोरी करून चाकूने वार करून गंभीर जखमी करणारा आरोपी तान्हया ऊर्फ विक्की नारायण जाधव (रा. लोहार मोहल्ला, जालना) याला गुरूवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. डी. देव यांनी दहा वर्ष सक्तमजुरी व २५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर आरोपी राणी मनोज खरात ऊर्फ रेणुका (रा. भिमनगर, जालना) हिला सात वर्ष सक्तमजुरी व २५ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे, अशी माहिती अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. दीपक कोल्हे यांनी दिली.
११ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी लातूर येथील मुलीला भेटण्यासाठी अविनाश शिवाप्पा कापसे हे जालना बसस्थानकातून उतरून रेल्वेस्टेशनकडे पायी जात होते. त्याचवेळी आरोपी तान्हया उर्फ विक्की नारायण जाधव, राणी मनोज खरात उर्फ रेणुका, सचिन सुभाष जाधव, गोट्या उर्फ प्रतिक गोसे, साहिल यांनी अविनाश कापसे यांना संग्रामनगर येथील वेशीजवळ नेऊन डोक्यात चाकूने मारून ७३ हजार रूपयांचा मुद्देमाल लुबाडून नेला होता. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासअंती पोलिसांनी आरोपी तान्हया उर्फ विक्की, राणी, सचिन यांच्याविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. गोट्या आणि साहिल फरार असल्याने त्यांच्याविरुध्द सीआरपीसी २९९ प्रमाणे फरार दाखवण्यात आले आहे. सरकार पक्षाच्या वतीने १० साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये प्राध्यापक अविनाश कापसे, पंच आनंद जनार्दन हिवाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील, तपासिक अंमलदार पोलीस उपनिरीक्षक जी.टी. झलवार यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.
दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर व समोर आलेल्या साक्षीपुराव्यावरून जिल्हा सत्र न्यायाधीश ए. डी. देव यांनी आरोपी तान्हया ऊर्फ विक्की नारायण जाधव यास १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व २५ हजार रूपयांचा दंड आणि आरोपी राणी मनोज खरात उर्फ रेणुका हिस ७ वर्ष सक्तमजुरी व २५ हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास ६ महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. दीपक कोल्हे यांनी काम पाहिले.