जालना : प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी चार आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मधुकर नामदेव देठे, अशोक मोहन हिवाळे, ज्ञानदेव मोहन हिवाळे, शेषराव मोहन हिवाळे (सर्व रा. आंबेगाव ता. जाफराबाद) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
८ जून २०१९ रोजी फिर्यादी, त्याचा चुलतभाऊ शिवाजी हिवाळे, काका संतोष हिवाळे हे तिघे जण दुचाकीवर बसून बसस्थानक येथून गावाकडे जात होते. गायत्रीनगरजवळ चार आरोपींनी त्यांच्या अंगावर कार नेण्याचा प्रयत्न केला. शिवाय, त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना शेतीच्या वादावरून घडली होती. याप्रकरणी आरोपींविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस उपनिरीक्षक गणेश झलवार यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी नऊ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी, जखमी साक्षीदार, डॉक्टर आदिनाथ पाटील, तपासिंक अंमलदार गणेश झलवार, यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. न्यायालयापुढे सरकार पक्षातर्फे आलेला साक्षीपुरावा व दोन्ही बाजूचा युक्तिवाद लक्षात घेऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश के. एम. जैस्वाल यांनी आरोपींना दहा वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. अशोक मते, ॲड. जयश्री सोळंके यांनी काम पाहिले.