विजय मुंडे
जालना : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याची खात्री पटल्यानंतर जिल्हा प्रशासनाने बुधवारी कंत्राटी तत्त्वावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवासमाप्तीचा आदेश काढला आहे. प्रशासनाच्या या आदेशामुळे दस्तुरखुद्द राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्यातील कंत्राटी कोरोना योद्ध्यांना ‘गरज सरो, वैद्य मरो’ या म्हणीचा प्रत्यय आला आहे. प्रशासनाच्या या आदेशामुळे बाधितांची आपुलकीने सेवा करणाऱ्या ३५० जणांवर उपासमारीची वेळ आली आहे.
मागील दीड वर्षापासून कोरोनाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. कोरोनाच्या या लढ्यात आरोग्य विभागातील कायम अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडू लागल्याने कंत्राटी तत्त्वावर आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर जिल्हावासीयांमध्ये प्रचंड दहशत पसरली होती. कोरोनाच्या या लढ्यात आरोग्य विभागातील कायम अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कंत्राटी तत्त्वावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही अहोरात्र रुग्णसेवा केली. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून कमी करण्यात आले होते; परंतु जीव मुठीत घेऊन रुग्णांची अविरत सेवा करणाऱ्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असतानाच कोरोनाची दुसरी लाट आली आणि शासनाने पुन्हा या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेतले.
गत काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरत आली आहे. असे असले तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यताही वर्तविली जात आहे; परंतु कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याची खात्री पटल्यानंतर जिल्हा प्रशासनाने पूर्वीप्रमाणे या वेळेसही आरोग्य विभागातील कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवासमाप्तीचे आदेश काढले आहेत. जिल्हा प्रशासनाने अचानक आदेश काढल्यामुळे या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता घरी बसावे लागणार आहे. खासगी दवाखान्यात शोधूनही नोकरी मिळत नाही. त्यामुळे अशा स्थितीत जगावे कसे? हाच प्रश्न या कंत्राटी कर्मचाऱ्यांसमोर आहे.
चौकट
जिल्हाधिकारी, सीएस नॉट नॉट रिचेबल
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवासमाप्तीचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये काढण्यात आला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
कोट
न्याय मिळावा, ही अपेक्षा
मागील दीड वर्षापासून कंत्राटी अधिकारी, कर्मचारी रुग्णांची अविरत सेवा करीत आहेत. रुग्णसेवा करताना अनेकांना कोरोनाची बाधा झाली; परंतु कोरोनावर मात करीत कर्तव्य महत्त्वाचे समजून सर्वांनी रुग्णसेवा केली. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे, असे असतानाच अचानक बुधवारी सेवासमाप्तीचा आदेश काढण्यात आला आहे. मागील दीड वर्ष आम्ही रुग्णांची सेवा केली आहे. महामारीच्या काळात जेथे नातेवाईक दूर जात होते, तेथे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बाधितांची सेवा केली आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना असे कामावरून कमी न करता त्यांच्या सेवेची दखल घेऊन न्याय द्यावा, ही अपेक्षा.
-ॲलेक जेकब, जालना