या योजनेतून शहराच्या विविध भागांमध्ये प्लास्टिकची जलवाहिनी टाकून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी योग्य दाबाने सर्व भागांना पाणी मिळावे म्हणून ९ जलकुंभ बांधण्यात आले आहेत. त्यातील आठ जलकुंभांचे काम पूर्ण झाले असून, याची चाचणी घेतली जात आहे. याच्या चाचणीसाठी आठही जलकुंभांमध्ये एक मीटर पाणी साठवून त्या जलकुंभातून पाणी गळते की काय हेही पाहिले जाणार आहे. कुठेच गळती आढळून न आल्यास ही चाचणी यशस्वी झाल्याचे समजण्यात येईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता राजेश बगळे यांनी दिली. ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर या योजनेतून पाणीपुरवठा करण्यासाठी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांच्या परवानगीनंतर तो लगेचच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
एकमेकांना जोडले जलकुंभ
जायकवाडी येथून जी मुख्य पाइपलाइन येते, त्यातून मस्तगड येथील पंपहाऊस आणि नंतर जेईएस महाविद्यालयाजवळील पंपहाऊसला जोडली आहे. कचेरी रोड येथील पंचायत समिती जलवाहिनीसह चंदनझिरा, कन्हैयानगर, रामनगर भागातही जलकुंभ जोडले आहेत.