जालना : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देण्यासाठी शासनाने नवीन धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार डीएड, बीएड अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनाही आता टीईटीची संधी मिळणार आहे. यात जिल्ह्यातील सहाशे विद्यार्थ्यांना ही संधी मिळू शकते.
जिल्ह्यात सहा डीएड कॉलेज आणि चार बीएड कॉलेज आहेत. यामध्ये जालना, अंबड, घनसावंगी, परतूर तसेच मंठा दहीफळ येथे डीएडची महाविद्यालय आहे तर जालना, अंबड येथे बीएड महाविद्यालय आहे. या सर्व महाविद्यालयातील जवळपास सहाशेपेक्षा अधिक विद्यार्थी अंतिम वर्षात असून, त्यांना टीईटी परीक्षा देण्याची संधी मिळणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यामुळे निकाल लागण्याआधीच ही परीक्षा देता येणार असल्याने चुरस आणखी वाढणार आहे.
१० ऑक्टोबर रोजी होणार परीक्षा
यंदाची टीईटी परीक्षा १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यादृष्टीने ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवरून मार्गदर्शन मिळत आहे. शासकीय पातळीवरूनही यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात असल्याची माहिती प्रा. प्रकाश मांटे यांनी दिली.
टीईटी ही परीक्षा देण्यासाठी आधी डीएडच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना संधी मिळत नव्हती ती आता मिळणार असल्याने त्यांचे आम्ही सोने करू. परीक्षेसाठी मोफत ऑनलाइन मार्गदर्शन मिळत आहे.- कृष्णा कदम
टीईट परीक्षेची संधी आमच्यासाठी पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. त्यादृष्टीने आमची तयारी सुरू आहे. तयारीला भरपूर वेळही आहे.
- स्वाती डोईफोडे