जालना : महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस अंबड जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी एक वर्षाची शिक्षा व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दिनकर किसनराव हामणे (४२, रा. झिरपी, ता. अंबड), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
झिरपी येथील सरकारी दवाखान्याजवळ १६ ऑक्टोबर २०१८ रोजी फिर्यादी महिला ही झिरपी फाट्याकडे जात होती. दहा वाजेच्या सुमारास आरोपी दिनकर हामणे याने दुचाकी वाकडी करून फिर्यादीचा रस्ता अडविला. शिवाय, फिर्यादीचा हात पकडून विनयभंग केला. फिर्यादीचा पती समजावण्यास गेला असता, त्यास शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात आरोपी दिनकर हामणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सदरील प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी, साक्षीदार, डीवायएसपी सी.डी. शेवगण यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. सरकार पक्षातर्फे वाल्मीक घुगे यांचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपी दिनकर हामणे यास एक वर्षाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास १५ दिवसांची साधी कैद आणि कलम ३४१ मध्ये एक महिन्याची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सहायक सरकारी वकील वाल्मीक घुगे यांनी काम पाहिले.