जालना : कारणे दाखवा नोटीस रद्द करण्यासाठी अंबड येथील जलसपंदा विभागातील सहायक अभियंत्याला कर्मचाऱ्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ताब्यात घेतले. बुद्धभूषण सुखदेव दाभाडे (३१) असे संशयिताचे नाव आहे.
तक्रारदार हे अंबड येथील जलसंपदा विभागात कर्मचारी आहेत. तक्रारदाराला गैरवर्तनाबद्दल सहायक अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी कारणे दाखवा नोटीस दिली होती. अनेकवेळा तक्रारदाराने ती रद्द करण्याची विनंती केली. मात्र, सहायक अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी ती रद्द करण्यासाठी तसेच नोकरीत सवलत देण्यासाठी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने याची तक्रार औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार पथकाने शुक्रवारी सापळा रचून सहायक अभियंता बुद्धभूषण दाभाडे याला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. संदीप राजपूत, कर्मचारी बाळू थोरात, केवल घुसिंगे, दत्तात्रय होरकटे यांनी केली आहे.