जालना : महिनेवारी भिसीच्या नावाखाली मित्र व ओळखीच्या नागरिकांकडून प्रतिमहा दहा हजार गोळा करून त्यातून मिळालेले ३ लाख ९० हजार रूपये घेऊन एक सुलून चालक कुटुंबियांसह फरार झाला. ही घटना जालना तालुक्यातील रेवगाव येथे घडली. या प्रकरणी गुरूवारी तालुका जालना पोलीस ठाण्यात पती-पत्नी व मेहुण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात शिवाजी आसाराम कापसे (३५, रा. रेवगाव ता. जालना) यांनी फिर्याद दिली आहे. रेवगाव येथे राहणारा सुलून चालक संशयित गणेश राधाकिसन यादव (४५), पत्नी (४५ रा. दोघे रा. रेवगाव) व मेहुणा विनोद सुरासे (रा. पळसखेडा ता. चिखली) यांनी दहा हजार रूपये प्रतिमहिना या प्रमाणे २५ मेंबरची भिसी सुरू केली होती. भिसीत पैसे भरून त्यातून एकदाच मिळणाऱ्या पैशातून काहीतरी मोठे काम होईल, म्हणून शिवाजी कापसे यांनी १६ जानेवारी २०२१ पासून ते ३ मार्च २०२२ पर्यंत प्रतिमहिना १० हजार रूपये प्रमाणे १ लाख ८० हजार रूपये भरले. त्यांनी पुन्हा २० महिन्यांच्या भिसीसाठी ८० हजार रूपये भरले. नंतर २२ महिन्यांच्या भिसीसाठी पुन्हा १ लाख ३० हजार रूपये भरले.
महिन्याच्या एक तारखेला चिठ्ठी टाकून चिठ्ठीत नाव निघणाऱ्या व्यक्तीस भिसीचे पैसे द्यायचे ठरले. यादवकडे जवळपास ३ लाख ९० हजार रूपये जमा झाले होते. ४ एप्रिल रोजी शिवाजी कापसे हे गणेश यादवकडे गेले असता, त्याचे दुकान बंद दिसले. शिवाय, घरालाही कुलूप दिसून आले. त्याला फोन केला असता, त्याचा फोन बंद दिसून आला. तो भिसीचे पैसे घेऊन फरार झाल्याचे कळताच, शिवाजी कापसे यांनी तालुका जालना पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी गणेश यादव, त्याचा मेहुणा व पत्नीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गणेश यादव याने गावातील २५ लोकांना फसविल्याचे तक्रारीत नमूद आहे.