तीर्थपुरी : नामांकित खत उत्पादक कंपन्यांच्या बॅगमध्ये बोगस खत भरण्याचा गाेरखधंदा तीर्थपुरीत सुरू होता. कृषी विभागाच्या पथकाने या गोदामांवर सोमवारी धाड टाकून पाचशेच्यावर बोगस खताच्या बॅगा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे खत निरीक्षक तथा मोहीम अधिकारी नीलेशकुमार भदाने यांच्या तक्रारीवरून गोंदी पोलिस ठाण्यात गणेश आसाराम बोबडे याच्याविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील शहागड रोडवरील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे एक मळ्यात हा प्रकार सुरू होता. या ठिकाणी खत साठवणुकीसाठी अनेक गोदामे तयार करण्यात आली होती. कृषी विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीत येथील या गोदामात विविध नामांकित कंपन्यांच्या बॅगमध्ये बोगस खत भरण्यात आल्याचे आढळून आले. तसेच या ठिकाणी विविध नामांकित कंपन्यांच्या हजारो रिकाम्या बॅगाचा साठाही आढळून आला आहे. कृषी विभागाच्या पथकाने केलेल्या पाहणीत सर्व कंपन्यांच्या बॅगांमध्ये एकाचप्रकारचे बोगस खत असल्याचे दिसून आले. यात भारत सरकार निर्मित किसान या खताच्या बॅगांमध्येही बोगस खत भरण्यात आल्याचे या ठिकाणी आढळून आले. या खताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. बोगस खत आणि बॅगा सील करून येथील साहित्य कोठेही न हलविण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
स्वत:च्या दुकानातून अनेकांना विकले बोगस खतबोगस खत तयार करणारा गणेश बोबडे यांचे तीर्थपुरीत येथील शहागड रोडवर साई एंटरप्राइजेस ॲन्ड ॲग्रो या नावाने कृषी सेवा केंद्र आहे. या दुकानाची तपासणी केली असता, बाेगस खताची विक्री या दुकानातून शेतकऱ्यांना करण्यात आल्याचे समोर आले आहे.