जालना : फाट... फाट.... फटाके फोडत गाड्या पळविणाऱ्या १३ बुलेटस्वारांवर शहर वाहतूक पोलिसांनी गुरुवारी कारवाई केली. त्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड आकारून सायलेन्सर जप्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडून जवळपास १३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शहरातील काही भागात सायलेन्स झोन आहे. त्यात कर्णकर्कश हॉर्न, फाट...फाट...फटाके फोडत गाड्या पळवून शांतता भंग करण्याचे प्रमाण वाढले आहे. अवैधरीत्या बसविण्यात आलेल्या कर्कश हॉर्न व सायलेन्सरमुळे ध्वनि प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. या आवाजामुळे शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. नागरिकांनी याची तक्रार पोलिस अधीक्षकांकडे केली. या तक्रारीहून त्यांनी तातडीने वाहतूक शाखेसह शहरातील पोलिस ठाण्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वाहतूक शाखेने गुरुवारी सकाळी शिवाजी महाराज पुतळा परिसर व इतर काही ठिकाणी मोहीम राबवून १३ बुलेटस्वारांचा बाजा वाजविला आहे. सायलेन्सर काढून त्यांच्याकडून प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गुणाजी शिंदे यांनी दिली.