५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 12:31 PM2024-11-25T12:31:24+5:302024-11-25T12:33:12+5:30

काँग्रेसचे तत्कालीन आमदार कैलास गोरंट्याल यांनी शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना डिवचण्यासाठी "५० खोके...एकदम ओके" अशी घोषणा माध्यमांसमोर दिली होती.

the congress MLA who first gave the famous slogan against eknath shinde shiv sena in the state also lost in the election from jalna | ५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत

५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत

Vidhan Sabha Result ( Marathi News ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली आणि पक्षाच्या ५६ पैकी ४० आमदारांनी शिंदे यांची साथ देणे पसंत केले. उद्धव ठाकरेंपासून दूर होण्यासाठी या आमदारांना प्रत्येकी ५० कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीतील विविध नेत्यांकडून करण्यात आला होता. त्यातच काँग्रेसचे तत्कालीन आमदार कैलास गोरंट्याल यांनी शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना डिवचण्यासाठी "५० खोके...एकदम ओके" अशी घोषणा माध्यमांसमोर दिली. नंतरच्या काळात राज्यभरात ही घोषणा बऱ्याच काळ चर्चेत होती. मात्र विधानसभा निवडणूक येईपर्यंत हा विषय मागे पडला आणि सरकारच्या लाडकी बहीण योजनेनं महाविकास आघाडीच्या सर्वच मुद्द्यांना चितपट केलं. तसंच ही घोषणा देणारे कैलास गोरंट्याल हेदेखील जालना विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले आहेत.

राज्याचे लक्ष लागलेल्या जालना विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत शिंदेसेनेचे उमेदवार माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी ३१ हजार ६५१ इतक्या मताधिक्याने बाजी मारली. तर काँग्रेसचे उमेदवार आ. कैलास गोरंट्याल यांचा पराभव झाला. जालना विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत २६ उमेदवार उभे होते. त्यातही काँग्रेसकडून आ. कैलास गोरंट्याल, शिंदेसेनेकडून अर्जुन खोतकर यांच्यातच सरळ लढत होत होती.  वंचितचे डेव्हिड घुमारे, भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार अशोक पांगारकर, काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार अब्दुल हाफिज यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीतील चुरस वाढली होती. 

प्रचारादरम्यान निवडणुकीच्या उमेदवारांनी एकमेकांवर टीकेचे बाण सोडत वातावरण चांगलेच तापविले होते. उमेदवारांनी शहरी, ग्रामीण भागातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून प्रचार केला. सभा, कॉर्नर बैठकांवरही लक्ष देण्यात आले होते. प्रचाराच्या या धामधुमीनंतर २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदान प्रक्रियेत जालना विधानसभा मतदारसंघात ६४.३९ टक्के मतदान झाले होते. तर शनिवारी झालेल्या मतमोजणीनंतर या मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकला असून, शिंदेसेनेचे अर्जुन खोतकर यांनी ३१ हजार ६५१ मते अधिक घेत विजय मिळविला. खोतकर यांना १ लाख ४ हजार ६६५ इतकी तर पराभूत उमेदवार गोरंट्याल यांना ७३ हजार १४ मते मिळाली आहेत. 

या निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार अब्दुल हाफिज यांना ३० हजार ४५४ मते घेतली असून, ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. वंचितचे उमेदवार डेव्हिड घुमारे यांना ६,३२२, भाजपचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार अशोक पांगारकर यांना २,२२७ मते मिळाली. इतर पक्षाचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांना मात्र अपेक्षित मते मिळालेली नाहीत. एकूणच या निकालानंतर अर्जुन खोतकर, अभिमन्यू खोतकर यांच्यासह महायुतीतील मित्र पक्षांच्या पदाधिकारी, समर्थकांसह शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. मतमोजणी केंद्रासह खोतकर यांच्या निवासस्थान परिसरातही एकच जल्लोष केला जात होता. खोतकर समर्थकांनी रात्री उशिरापर्यंत शहरातील विविध भागांत एकच जल्लोष करीत फटाक्यांची आतषबाजी केली.

गोरंट्याल यांच्या पराभवाचे कारण... 

काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांचा ३१ हजार ६५१ मतांनी पराभव झाला. तर काँग्रेस पक्षातील बंडखोर उमेदवार अब्दुल हाफिज यांनी ३० हजार ४५४ मते घेतली. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत निकाल लागेल, ही मविआची आशा विधानसभेच्या निकालात फोल ठरली. दरम्यान, जनतेने दिलेला कॉल आपल्याला मान्य असून, यापुढेही आपण जनतेच्या सेवेत कार्यरत राहणार आहोत. आजवर पाणीप्रश्न सोडविण्यासह मेडिकल कॉलेज मंजूर करून सुरू करण्यात यश आले आहे. यापुढेही जनसेवा सुरूच राहील, असे कैलास गोरंट्याल यांनी सांगितले.
 

Web Title: the congress MLA who first gave the famous slogan against eknath shinde shiv sena in the state also lost in the election from jalna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.