- दीपक ढोलेजालना : काही दिवसांपासून जिल्ह्यात १०.२६.२६, १२.३२.१६ व डीएपी ही तीन खते मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी हैराण झाले असून, अधिकच्या दराने खते खरेदी करावी लागत आहेत. याकडे कृषी विभागाचेही दुर्लक्ष आहे.
महिनाभरापासून शेतकऱ्यांच्या पसंतीची खते मिळत नाहीत, तर दुसरीकडे रासायनिक खतांच्या लिंकिंगने बळीराजा बेजार आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेले प्रशासन करते तरी काय? असा सवाल होत आहे. उत्पादन वाढीसाठी शेतकरी रासायनिक खताला पसंती देतात. परंतु, ज्या खताला शेतकऱ्यांची जास्त मागणी असते, त्या खतासोबत शेतकऱ्यांना नको असलेली खते जबरदस्तीने विकली जातात. अन्यथा दोनशे ते चारशे रुपये जादा दराने खताची खरेदी शेतकऱ्यांना करावी लागत असल्याचे चित्र आहे. पेरणीपासूनच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चढ्या दराने खत खरेदी करावे लागले. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी पिकांना खताचा दुसरा डोस देत आहेत. मात्र १०:२६:२६, १२:३२:१६ आणि डीएपी ही तीन खते मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
खतांची साठेबाजी ?बहुतांश दुकानदार खतांची साठेबाजी करीत आहेत. असे असतानाही कृषी विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. कृषी विभागाने नेमलेली पथके नावालाच असल्याचे दिसून येत आहे. कृषी अधीक्षकांचे पद हे गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून रिक्त आहे. त्याचा पदभार जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी भीमराव रणदिवे यांच्याकडे दिला आहे. मात्र, ते कार्यालयात हजर राहत नाहीत. शिवाय, जिल्ह्यात खताचा तुटवडा असतानाही ते लक्ष देत नाहीत.
मला पिकाला टाकण्यासाठी १०.२६.२६ या खताची गरज होती. मी भोकरदन शहरासह परिसरातील अनेक दुकानांवर पाहिले. परंतु, तेथे खत उपलब्ध नव्हते. एका ठिकाणी होते, त्याने भाव जास्त सांगितला. नाईलाजाने मला खत खरेदी करावे लागले.- सय्यद जावेद, शेतकरी,
सध्या डीएपी, १२.३२.१६ ही खते मिळणे अवघड झाले आहे. एखाद्या दुकानात मिळाली तर तेथे जास्तीचा दर लावला जात आहे. याकडे कृषी विभागाने लक्ष देऊन तत्काळ खत उपलब्ध करून द्यावे.- गणपत मोरे, शेतकरी
उपलब्ध खताचा साठा- खताचे नाव उपलब्ध साठा१०.२६.२६ १७८०युरिया २०४५६डीएपी १२९७एमओपी ३६७एनपीकेएस १३०९२एसएसपी १२८९८