वडीगोद्री (जि. जालना) : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील रामगव्हाण रोडवरील मैदानावर रविवारी मराठा समाजाची राज्यस्तरीय महासंवाद बैठक होणार आहे. या बैठकीत मनोज जरांगे- पाटील काय भूमिका मांडतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीसाठी मैदानावर मंडप उभारण्यात आला असून, पोलिसांचाही या ठिकाणी मोठा बंदोबस्त राहणार आहे.
मराठा आरक्षण, सगेसोयऱ्यांबाबतच्या अध्यादेशाची अंमलबजावणी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासह इतर विविध मागण्यांवर शासनस्तरावर निर्णय होत नसल्याने जरांगे-पाटील यांनी यापूर्वीच वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे. समाजबांधवांशी चर्चा करून पुढील दिशा ठरविण्याची भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली होती.
आंदोलकांना अंगावर घेऊ नका : जरांगेज्या मराठा समाजाने तुम्हाला निवडून दिले त्यांच्यावर तुम्ही खोटे गुन्हे दाखल करत आहात. मराठा आंदोलकांना अंगावर घेऊ नका.अन्यथा तुमचा सुपडा साफ होण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी वांबोरी (जि. अहमदनगर) येथे बैठकीत दिला.सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले.