धावडा (जि. जालना) : भरधाव ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने वास्तुशांतीसाठी लागणारे पूजेचे साहित्य आणण्यासाठी गेलेल्या सतीश पांडुरंग घोरपडे (वय २३) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी वाढोणा (ता. भोकरदन) शिवारात घडली.
वाढोणा येथील सतीश घोरपडे यांच्या कुटुंबाने गावाच्या शेजारी घराचे बांधकाम केले होते. त्या घराची शुक्रवारी वास्तुशांती होती. वास्तुशांतीच्या पूजेसाठी लागणारे आंब्याचे फाटे आणण्यासाठी तो शेतात जात होता. त्यावेळी भरधाव ट्रकने (क्र. एम.एच.१८-बी.ए. ०१४२) त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. अपघातात तो २५ ते ३० फूट फरपटत गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक सोडून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पारध पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच ट्रक ताब्यात घेतला.
धावडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन झाल्यानंतर मयताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे. अपघाती मृत्यूमुळे सतीश याचे नवीन घरात राहण्याचे स्वप्न अधुरे राहिले. सतीशचा अपघाती मृत्यू झाल्याने गावकरी हळहळ व्यक्त करीत आहेत. या प्रकरणात राजू पांडुरंग घोरपडे यांच्या तक्रारीवरून ट्रक चालक समाधान कुंडलिक पाटील (रा. धुळे) याच्याविरुद्ध पारध पोलिसात नोंद झाली असून, तपास धावडा बिट जमादार प्रदीप सरडे, जीवन भालके हे करीत आहेत.