वडीगोद्री (जि.जालना) : माझ्या पप्पाच्या जीवाला काही झालं तर आई जिजाऊची शपथ घेउन सांगते, या सरकारला जागेवर ठेवणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांची कन्या पल्लवी जरांगे यांनी लोकमतशी बोलताना सरकारला दिला.
मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा सोलापूर- धुळे महामार्गावरील अंकुशनगर येथे आली असता पत्नी सोमित्रा जरांगे, मुलगी पल्लवी जरांगे यांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी पत्नी, मुलीसह मुलगा शिवराज यांनाही आश्रू अनावर झाले होतेे. सात महिन्यानंतर या पदयात्रेत जरांगे यांचे कुटुंब एका ठिकाणी दिसून आले.
यावेळी लोकमतशी बोलताना पल्लवी जरांगे म्हणाली, मराठा आरक्षणासाठी माझे वडील मागील सात महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत. तरीही निर्दयी सरकारने मागण्या मान्य केलेल्या नाहीत. सात महिन्यांपासून वडिल आमच्या कुटुंबासोबत नाहीत. सरकारने अनेक आश्वासने दिली आणि मुंबईला जाण्याची वेळ आणली. शासनाने लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात, सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावे, माझ्या पप्पांच्या जिवाला काही झालं तर या सरकारला जागेवर ठेवणार नाही, असा इशाराही डबडबत्या आश्रूंनी पल्लवी जरांगे हिने सरकारला दिला.