भोकरदन: विधानसभा निवडणुका कधीही झाल्या तरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होईल., असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. तसेच पराभवाच्या भीतीनेच महायुती सरकारवरने विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आयोजित शिवस्वराज्य रथ यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, या यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप भोकरदन येथे करण्यात आला. यावेळी पाटील बोलत होते.
भाजपाचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांचा गड असलेल्या भोकरदन येथे रविवारी रात्री शिवस्वराज्य यात्रेच्या समारोपा दरम्यान जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, महायुतीचे सरकार निवडणुकींना घाबरत असून त्यामुळेच निवडणुका पुढे लोटण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र निवडणुका कधीही घ्या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचाच असेल. कार्यकर्त्यांनी संयमाने निवडणुकीला सामोरे जावे व बेरजेचे राजकारण करून आपल्या उमेदवारास विजयी करावे, असे आवाहन देखील पाटील यांनी केले.
खासदार अमोल कोल्हे यांनी शिवस्वराज्य यात्रेच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत भोकरदन विधानसभेचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. तर माजी पालकमंत्री राजेश टोपे यांनी शरद पवारांच्या विचारांवर आधारित राजकारण समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देऊ शकते, असे सांगत विरोधकांच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले.
स्थानिक नेत्यांमधील वाद अन् जयंत पाटील संतापलेशिवस्वराज्य यात्रेच्या समरोपा दरम्यान, माजी आमदार चंद्रकांत दानवे आणि जाफराबाद नगराध्यक्षा सुरेखा लहाने यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या गोंधळामुळे सभेचे वातावरण तंग झाले होते. यावर जयंत पाटील यांनी कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली आणि पक्षाच्या शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन केले, गोंधळ घालून विरोधकांना मदत होऊ नये, अशीही सूचना दिली.