जालना : जालना, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथून दुचाकी चोरणाऱ्यास साथीदासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई शनिवारी करण्यात आली आहे. अतिक अहेमद ईसाक खान पटेल (रा. मदिना चौक, जुना जालना), अशोक राम कसबे (इंदिरानगर, जालना) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३ लाख ८५ हजार रुपयांच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
दुचाकी चोरी करणाऱ्यांबाबत माहिती काढत असताना, सदर बाजार पोलिस ठाणे , छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथून संशयित अतिक अहेमद ईसाकखान पटेल याने दुचाकींची चोरी केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांना मिळाली. या माहितीवरून पथकाने अतिक अहेमद ईसाकखान पटेल याचा शोध घेतला असता, तो मदिना चौक येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली. यावरून त्याला ताब्यात घेतले. त्याला दुचाकी चोरीबाबत विचारपूस केली असता, त्याने सदर बाजार, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथून दुचाकी चोरीची कबुली दिली.
सदर दुचाकींची तो अशोक कसबे याच्या मार्फत विक्री करीत असल्याचे त्याने सांगितले. त्यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे, अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे, प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, पोहेकॉ. जगदीश बावणे, रुस्तुम जैवाळ, परमेश्वर धुमाळ, रवी जाधव, किशोर पुंगळे, सचिन राऊत यांनी केली आहे.