अंबड : ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अंबड शाखेत गेल्या तीन महिन्यापासून आर्थिक देवाणघेवाण बंद आहेत. त्यामुळे ठेवीदार आर्थिक संकटात सापडलेले आहेत. ठेवी परत देण्याची मागणी करत ठेवीदारांनी आज सकाळपासून अंबड तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या अंबड शाखेत कोट्यावधी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. बँक व्यवस्थापनाकडून काही महिन्यापासून ठेवीदारांची आर्थिक कोंडी केली जात असल्याने ठेवीदारांमध्ये संताप निर्माण झाला आहे.ठेवी परत देण्याची मागणी करत ठेवीदारांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शाखा त्वरित सुरू करून रक्कम परत करावी, उपोषण स्थळी आंदोलकांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी यांचे पासपोर्ट, मालमत्ता जप्त कराव्यात, अशा मागण्या ठेवीदार न्याय हक्क कृती समिती अंबड यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केल्या आहेत.
फसवणूक झाली विधवा मुलीचे शेती विकून आलेले पैसे ठेवले होते. मिळाले नाहीत. क्रेडिट सोसायटी कडून फसवणूक झाली आहे.- समिंद्रा डेरे
मजुरीचे पैसे होते मोलमजुरी करून जमवलेले पैसे बचत म्हणून बँकेत ठेवले होते. व्याजदराच्या अपेक्षेपोटी गुंतवणूक केली होती. आता पैसे मिळत नसल्यामुळे आर्थिक अडचणी सापडले आहे.- कासाबाई वराडे
चिंता वाटते दवाखान्यात पैसा उपयोगी येईल या आशेमुळे येथे पैसे ठेवले. आता ठेवी परत मिळत नसल्याने चिंता आहे. - मंडाबाई वराडे
चिंता वाटत आहे पशुधन विकून आणि बचतीची रक्कम मिळत नसल्याने आता चिंता आहे.- पद्मा रणमळे