जालना/छत्रपती संभाजीनगर : भोकरदन तालुक्यात मराठा समाजाने लावलेले बोर्ड तोडल्याने आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. बोर्ड तोडणाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास पुढे काय करायचे ते बघून घेऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. २४ तारखेपर्यंत ज्यांना गावात यायचे आहे, त्यांना येऊ द्या, त्यांना हिंडू, फिरू द्या; पण त्यांचा पाहुणचार करू नका, असेही ते म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे पाटील चितेपिंपळ येथे आले होते. यावेळी त्यांच्यावर फुलांची उधळण करत जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी गाडीच्या टपावर उभे राहूनच लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा समाजाला एकजुटीचे आवाहन केले. ते म्हणाले की, गावात यायचे असेल तर येऊ द्या; पण बोर्ड फाडून यायचे नाही. इथून पुढे जर प्रवेशबंदीचा बोर्ड फाडला तर महाराष्ट्रातील मराठे आम्ही तुमच्या मागे लागू. आमच्या नादी लागू नका.
दहा दिवसांनंतर उपोषणस्थळी
वडीगोद्री (जि. जालना) : छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे दहा दिवसांनी रविवारी सायंकाळी अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी दाखल झाले. अंतरवालीतील उपोषणस्थळी जरांगे पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच एका घरी लक्ष्मीपूजनही केले.
‘दिवाळी साजरी करणार नाही’
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक समाजबांधवांनी आत्मबलिदान दिले. देवगाव रंगारी येथे आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना मी भेटून आलो. त्याच्या घरातील परिस्थिती पाहून मन सुन्न झाले. अशा परिस्थितीत आम्ही यंदाची दिवाळी साजरी करणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. कोणीही आत्महत्या करू नये, आत्महत्या केल्यास आरक्षण कोणाला द्यायचे, असा सवालही त्यांनी तरुणांना केला.
बॅनरवरून हाणामारी
भोकरदन (जि. जालना) : आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदी केली असून, या गावबंदीच्या बॅनरवरून बोरगाव जहागीर (ता. भोकरदन) येथे दोन गटांत हाणामारी झाली. ही घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून नऊ जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. याचे फलक गावागावांत लागले आहेत. याच फलकावरून शनिवारी रात्री बोरगाव जहागीर गावात हाणामारी झाली. यात पाच जण जखमी झाले आहेत.
‘भांडणे लावू नयेत’
मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांची अंबडमध्ये जाहीर सभा नियोजित आहे. यावर जरांगे म्हणाले की, ओबीसी समाजालाच वाटते की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. केवळ ओबीसी नेते मराठा समाजाविरोधात विष पसरवीत आहेत. ओबीसी नेत्यांनी जाती-जातींमध्ये भांडण लावू नये.