जालना : ऑनलाइन जॉबसाठी टास्क देऊन एका सैनिकाला ३७ लाख २२ हजार ८४२ रुपयांना गंडा घातल्याची घटना भोकरदन शहरात उघडकीस आली. या प्रकरणी सैनिक गजानन नामदेव दांडगे यांच्या फिर्यादीवरून मंगळवारी भामट्यांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोकरदन शहरातील गजानन नामदेव दांडगे हे सैन्य दलात नोकरी करतात. ते ९ मे २०२३ रोजी घरी होते. त्याचवेळी आरतीक कुमार या आयडीवरून त्यांच्या टेलिग्रामवर मॅसेज पाठविण्यात आला. त्यात त्यांना ऑनलाइन जॉबची ऑफर देण्यात आली. यासाठी त्यांना टास्क देण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते. त्यानंतर त्यांना एका कंपनीची लिंक पाठविण्यात आली. त्यावर अकाउंट तयार करण्यास सांगितले. काही वेळानंतर टेलिग्रामवरील आणखी एक ग्रुप जॉइन करण्यास सांगितले. ग्रुप जॉइन केल्यानंतर हॉटेल रॅकिंग देण्यासाठी टास्क देण्यात आला. टास्क पूर्ण केल्यानंतर गजानन दांडगे यांना ८०० रुपये मिळाले.
दरम्यान, १५ मे रोजी दुपारी १ वाजता दुसऱ्या टास्कसाठी दांडगे यांना १० हजार ५०० रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. गजानन दांडगे यांना वेगवेगळी कारणे सांगून वेळोवेळी कधी दोन, तर कधी तीन लाख रुपये कंपनीच्या खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगितले. १ सप्टेंबर रोजी त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तोपर्यंत त्यांनी जवळपास ३७ लाख २२ हजार ८४२ रुपये ट्रान्सफर केले. या प्रकरणी गजानन दांडगे यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सायबर पोलिस करीत आहेत.