- नसीम शेखटेंभुर्णी :मराठवाडा मुक्तिसंग्रामात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा शासनाकडून गौरव करण्यात येत आहे; मात्र मुक्तिसंग्रामात शहीद झालेल्या क्रांतिकारकांच्या स्मारकाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. जाफराबाद तालुक्यातील वरूड बुद्रुक येथील हुतात्मा स्मारकाची मोठी दुरवस्था झाली आहे. या स्मारकाकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर ते इतिहासजमा होण्याची शक्यता आहे.
मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक परिसरातील भगवंतराव देशमुख, जयसिंग घायवट, तुकाराम सातव, सिताराम सातव, शामराव कुलकर्णी या शहिदांचा समावेश आहे त्यांच्या स्मरणार्थ हुतात्मा स्मारक उभारण्यात आले आहे. १९८०च्या दशकात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांच्या आदेशाने वरूड बुद्रुक येथे स्मारक आणि स्तंभ उभारण्यात आला आहे.
स्मारकाची पडझडसुमारे ४५ वर्षांपूर्वी येथे मराठवाडा मुक्तिसंग्रामातील शहिदांच्या आठवणींसाठी स्मारक उभारण्यात आले; परंतु सध्या या स्मारकाची दुरवस्था झालेली आहे. शहीद स्तंभाची पडझड झालेली असल्याने तो नष्ट होण्याच्या मार्गावर आला आहे. स्तंभासाठी स्वतंत्र संरक्षक भिंत नसल्याने कुत्री व इतर जनावरांचा या ठिकाणी मुक्त संचार असतो. या स्तंभाच्या देखरेख करण्याची यंत्रणा नसल्याने परिसरात मोठी घाण साचलेली असते. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन या स्मारकाचे संर्वधन करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
संवर्धन करण्याची गरजशहीद स्मारकाची देखरेख करण्याची जबाबादारी बांधकाम विभागाची असल्याचे सांगण्यात येत होते; परंतु स्मारकाचे संवर्धन करण्याचे काम राज्य पुरातत्त्व विभागाकडे देण्यात आले आहे; मात्र पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्मारकाकडे पाठ फरविल्याचे दिसून येत आहे.