- शेषराव वायाळपरतूर (जालना) : महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनाविरोधी चळवळ गतिमान करून ग्रामपातळीवर बालविवाह प्रतिबंध मोहीम सक्षम करणार असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिली. नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी शनिवारी त्या परतूर येथे आल्या असता ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कपिल आकात, वर्षा आकात, विजय राखे, अंकुश तेलगड, माउली लाटे, सय्यद आरीफ अली यांची उपस्थिती होती.
चाकणकर म्हणाल्या, विधवा प्रथा, बालविवाह, लैंगिक, मानसिक अत्याचार याविरोधात ग्रामपातळीवर मोठ्या प्रमाणात जागृती करण्याची गरज आहे. यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपातळीवरील सरपंच, सदस्य यांचा सहभाग वाढवावा लागणार आहे. ग्रामीण भागात बालविवाहाचे प्रमाण अधिक आढळते. चौदाव्या वर्षाच्या मुलीचे लग्न होऊन पंधराव्या वर्षी गरोदर राहते. मुली अपत्य जन्माला घालण्यास अपरिपक्व असल्याने बाळाला तसेच तिच्या जीवितास धोका निर्माण होतो. त्यामुळे स्तनदा माता, सुदृढ बालक हे स्वप्न साकार होत नाही. त्यामुळे बालविवाह रोखण्यासाठी आणि अशा घटना टाळण्यासाठी सरपंच, सदस्य, कर्मचारी, पालक, विवाह लावणारे पुरोहित यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. तसेच कामाच्या ठिकाणी तसेच सार्वजनिक ठिकाणी महिला व मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने सक्षम उपाययोजना करण्यात येणार आहे. मुलींची छेड किंवा अत्याचार झाल्यास तत्काळ भरोसा सेल, दामिनी पथक व पोलीस यंत्रणेशी संपर्क करावा. महिला आयोग अशा तक्रारींची तत्काळ दखल घेईल, असेही यावेळी चाकणकर यांनी सांगितले. परतूर येथील कार्यक्रमात चाकणकर यांनी महिला व कार्यकर्त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी बबन गनगे, योगेश बरकुले, शिवा करपे, सरपंच माउली माटे, उद्धवराव कदम, कैलास मुळे, मुंजाभाऊ वावहळ, कदीर कुरेशी, अखिल काजी, रजाक कुरेशी उपस्थित होते.