जालना : शहरातील मंठा चौफुली परिसरातील एका रूग्णालयात बॉम्ब असल्याचा फोन डायल ११२ क्रमांकावर आला. त्यामुळे पोलिसांची धांदल उडाली. पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकासह रूग्णालयाकडे धाव घेतली. तेथे तपासणी केली असता, काहीच आढळून आले नाही. ही घटना बुधवारी रात्री एक वाजेच्या सुमारास घडली, अशी माहिती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी दिली.
जालना शहरातील मंठा चौफुली येथे श्रीकृष्ण हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती एका व्यक्तीने डायल ११२ क्रमांकावर बुधवारी रात्री एक वाजेच्या सुमारास दिली. माहिती मिळताच, पोलिस अधीक्षकांसह उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी बॉम्ब शोधक पथकालाही बोलविण्यात आले होते. पथकाने रूग्णालयाचा प्रत्येक भाग तपासला. परंतु, काहीच सापडले नाही. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला. पोलिसांनी ज्या क्रमांकावरून फोन आला, त्याला परत फोन केला असता, त्याने फोन बंद केल्याचे दिसून आले. त्याचा शोध घेतला असता, तो संजय राठोड असल्याचे समजले. त्याच्याविरुध्द तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध घेत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी दिली. खोटी माहिती देऊ नका अन्यथा कारवाई होईल
सदरील व्यक्तीने खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केली आहे. त्याच्याविरुध्द आम्ही गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे. अशा प्रकारे पोलिसांना खोटी माहिती देऊ नका, नाहीतर कडक कारवाई केली जाईल.
जनार्दन शेवाळे, पोलिस निरीक्षक, तालुका पोलिस ठाणे