भोकरदन (जि.जालना) : बकऱ्या चोरून नेत असताना चोरट्यांची कार रस्त्यात पंक्चर झाली. ग्रामस्थांनी हटकल्यामुळे घाबरलेल्या चोरट्यांनी स्वतःची कार पेटवून देत पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांनी एका चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तर दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाल्याची घटना भोकरदन - हसनाबाद रस्त्यावरील निमगाव गावाजवळ रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली.
भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथून तीन चोरट्यांनी रविवारी पाच ते सहा बकऱ्या चोरून आणल्या होत्या. त्या बकऱ्या स्विफ्ट गाडीत टाकून ते भोकरदनकडे निघाले होते. त्यातच निमगावाजवळ आल्यावर कार पंक्चर झाली. चोरट्यांनी बकऱ्या कारमधून बाहेर काढल्या. काही ग्रामस्थ तेथे आले. त्यांनी चोरट्यांना बकऱ्या कुठून आणल्या, असे विचारले. त्यावेळी चोरट्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिले.
ग्रामस्थांचा संशय बळावला. याची माहिती भोकरदन पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे चोरटे हे चांगलेच घाबरले. त्यांनी स्वतःची कार पेटवून देत तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांनी पाठलाग करून एका चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले तर दोघे जण हाताला झटका देऊन फरार झाले. पोलिसांनी आरोपीसह बकऱ्या पोलिसांच्या ताब्यात दिल्या. त्याची चौकशी केली जात आहे. फरार झालेल्या दोन चोरट्यांचा देखील शोध घेतला जात असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी सांगितले.