जालना : डायल 112 वर आलेल्या कॉल वरून मदतीसाठी केलेल्या पोलिसांना दोघांनी धक्काबुक्की केल्याची घटना जालना शहरातील शास्त्री मोहल्ला येथे सोमवारी रात्री घडली.
जुन्या जालन्यातील शास्त्री मोहल्ल्यात सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास एका व्यक्तीने डायल 112 कॉल करून आपल्या मुलास व बहिणीच्या मुलास काही व्यक्ती मारहाण करीत असल्याचे सांगून मदतीची विनंती केली होती. त्यावेळी पोलीस कर्मचारी मुकेश पठ्ठे हे सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मध्यस्थी करत वाद मिटविला व दोन्ही गटाला पांगविण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी पोलीस कर्मचारी पठ्ठे हे घटनास्थळाचे व्हिडिओ चित्रीकरण करीत होते. तेवढ्यात तेथे असलेले संशयित गणेश रामभाऊ गोगडे आणि त्याचा भाऊ श्याम उर्फ बबन रामभाऊ गोगडे यांनी मुकेश पठ्ठे यांच्या हातातील मोबाईल हिसकावत त्यांना मज्जाव केला. त्यानंतर धक्काबुक्की केली व शिवीगाळ करीत धमक्या दिल्या. यावेळी सोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करीत शाम उर्फ बबन यास ताब्यात घेतले आहे. तर गणेश हा पळून जाण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी कदिम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.