जालना : वाळू तस्कारांनी १५ ते २० जणांचा जमाव करून तहसीलदारांना धमकी देऊन वाळूचे ट्रॅक्टर पळविल्याची घटना परतूर शहरातील मोंढा भागात शनिवारी घडली. या प्रकरणी तहसीलदार रूपा चित्रक यांच्या फिर्यादीवरून १५ ते २० जणांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परतूर शहरातील मोंढा भागातून सकाळी आठ वाजेच्या सुमारास अवैध वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती तहसीलदार रूपा चित्रक यांना मिळाली. या माहितीवरून तहसीलदार रूपा चित्रक या कर्मचारी प्रमोद जईद, कोतवालासह सदरील ठिकाणी गेल्या. यावेळी लाल रंगाच्या ट्रॅक्टरमध्ये (क्रमांक एमएच.२१.८२२५) अंदाजे एक ब्रास वाळूची वाहतूक केली जात असल्याचे दिसले. वाळू तहसीलदारांनी सदरील ट्रॅक्टर चालकाला थांबण्यास सांगितले. परवान्याबाबत विचारपूस केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिले. त्यानंतर ट्रॅक्टर सोडून पळ काढला. सदरील ट्रॅक्टर परतूर पोलीस ठाण्यात नेण्यासाठी वाहनचालकाचा शोध घेत असतांनाच, १५ ते २० जण जमा झाले. त्यांनी तहसीलदारांशी हुज्जत घातली. त्यानंतर धमकी देऊन ट्रॅक्टर पळून घेऊन गेले. या प्रकरणी तहसीलदार रूपा चित्रक यांच्या फिर्यादीवरून वाहनचालक व मालक यांच्यासह १५ ते २० जणाविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.