- फकिरा देशमुखभोकरदन ( जालना): येथील वर्षा सारंग चौधरी ( 41) यांचा ब्रेन स्ट्रोकने रविवारी (दि. १९) मृत्यू झाला. ब्रेन डेड असल्याने नातलगांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्याने पाच जणांना जीवदान मिळाले. मात्र, आजारपण आणि मृत्यूची वार्ता दहावीच्या परीक्षा सुरु असलेल्या त्यांची मुलगी गायत्रीला देण्यात आली नव्हती. आज गायत्रीचा विज्ञान विषयाचा पेपर होता. पेपर देऊन बाहेर येताच गायत्रीला आई जग सोडून गेल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर गायत्रीस थेट अंत्यसंस्कार स्थळी नेण्यात आले.
या बाबतची माहिती अशी की, भोकरदन येथील सारंग चौधरी यांचा मुलगा देव हा सातारा येथे एमबीबीएस प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे. त्याला सोडण्यासाठी सारंग चौधरी, पत्नी वर्षासह अक्कलकोट, पंढरपूर असे देवदर्शन करत 14 मार्च रोजी सातारा येथे पोहचले. मात्र अचानक वर्षा यांना त्रास जाणवू लागला. स्थानिक हॉस्पिटलमधील उपचारानंतर त्यांना पुणे त्यानंतर 16 मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले . येथे उपचारानंतर डॉक्टरांनी वर्षा यांना ब्रेन डेड घोषित केले. नातेवाईकाने अवयदानाचा निर्णय घेतला. या निर्णयाने पाच जणांना जीवदान मिळाले आहे. त्यानंतर आज त्यांचे पार्थिव भोकरदन येथे नेण्यात आले. दरम्यान, वर्षा यांची मुलगी गायत्रीची दहावीची परीक्षा सुरु आहे. त्यामुळे गायत्रीला आईचे आजारपण आणि मृत्यूची वार्ता देण्यात आली नव्हती. आज गायत्रीचा विज्ञान विषयाचा पेपर होता. दुपारी पेपर झाल्यानंतर बाहेर येताच गायत्रीस आईच्या मृत्यूची माहिती देण्यात आली.
आई दवाखान्यात असताना मुलीची सुरु होती परीक्षा गायत्रीला आईची तब्येत ठीक नाही अशी माहिती होती. नातेवाईकांनी तिला आईची तब्येत बरी असून तून परीक्षा झाल्यास तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये जा असे सांगितले होते. मात्र, आज पेपर देऊन बाहेर येताच आई जग सोडून गेल्याचे कळताच तिच्यावर आभाळच कोसळले. दुपारी शोकाकुल वातावरणात वर्षा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आईची शेवटची भेट होऊ शकली झाली नाही म्हणून गायत्रीने हंबरडा फोडला. हे दृश्य पाहून उपस्थितांनी देखील अश्रूंना वाट मोकळी करून दिली.