जालना : कोरोनाची तिसरी (Corona Virus ) लाट शमली आहे. असे असले तरी मास्क मुक्तीसह लागू निर्बंध हटविण्याबाबत योग्यवेळी मुख्यमंत्री ( CM Udhav Thakarey ) निर्णय घेतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope) यांनी दिली. तसेच राज्यातील प्रत्येक तालुकास्तरावरील शासकीय रुग्णालयांमध्ये एमआरआय, सिटी स्कॅन, सोनोग्राफीची सेवा देण्याचे नियोजन शासन करीत आहे. लवकरच ही सेवा राज्यभरात सुरू होणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले.
जालना शहरात रविवारी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत राज्यात दैनंदिन ४८ हजारांपर्यंत रुग्ण आढळत होते. आता ही संख्या ८०० वर आली आहे, तर राज्यात दोन हजार ॲक्टिव्ह पेशंट आहेत. त्यामुळे तिसरी लाट जवळजवळ संपल्याची स्थिती आहे, असे असले तरी कोरोना संपला आहे असे समजून चालणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणतात. त्यामुळे मास्क मुक्ती आणि इतर निर्बंध हटविण्याचे निर्णय विचारपूर्वकच घेतले जाणार आहेत. कोरोनाच्या कालावधीत आरोग्य सेवा अधिक बळकट झाली आहे. यापुढील काळात राज्यातील सर्वच जिल्ह्यातील तालुकास्तरावर असलेल्या रुग्णालयांमध्ये एनएचएमच्या माध्यमातून एमआरआय, सिटी स्कॅन, सोनोग्राफीची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आऊटसोर्स पद्धतीने ही सेवा दिली जाणार असून, गरिबांना याचा मोफत लाभ मिळणार असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.
परभणी, अमरावती मेडिकल कॉलेजसाठी लवकरच निधीआगामी बजेटमध्ये परभणी व अमरावती येथील मेडिकल कॉलेजसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. जालना व हिंगोली येथील मेडिकल कॉलेज लवकर व्हावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मेडिकल कॉलेज मंजूर झाल्यानंतर स्थानिक पातळीवर आणखी चांगली आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
लस एक्सपायर होणे म्हणजे राष्ट्रीय नुकसानज्या डोसची उपलब्धता व्हावी म्हणून वेळोवेळी भांडणे करावी लागली. त्याच लसींची एक्सपायरी होत असेल तर ही बाब म्हणजे राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होण्यासारखे आहे. त्यामुळे येणारी लस वेळेत द्यावी, नागरिकांनी वेळेत घ्यावी, यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. लसीचे नुकसान होऊ नये यासाठी राष्ट्रीय पातळीवर पॉलिसी ठरविणे गरजेचे आहे. त्यांच्या पॉलिसीला राज्याची आवश्यक ती मदत मिळणार आहे.