अंबड (जालना): अंबड तालुक्यातील कर्जत-लोणार-भायगाव रस्त्यावर शेंडगे तांडा येथे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर रस्त्याच्या खाली उलटून झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ( दि.२ ) दुपारी २. ३० वाजेच्या सुमारास घडली. आदित्य भगवान उन्हाळे ( २०, रा. आवा अंतरवाला ता.अंबड ) असे मृत चालकाचे नाव आहे.
आवा अंतरवाला येथील आदित्य हा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत असेल. सोमवारी दुपारी आदित्य ट्रॅक्टर ट्रॉलीमधील माल रिकामा करून परत चालला होता. कर्जत गाव शिवारातील शेंडगे तांडा येथे रस्त्याचा अंदाज न आल्याने नियंत्रण सुटून ट्रॅक्टर रस्त्याखालील खड्ड्यात जाऊन उलटले. यावेळी चालक आदित्य हा ट्रॅक्टर खाली दबला गेला. वेळीच बाहेर पडता न आल्याने आदित्यचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, माहिती मिळताच अंबड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक छोटुराम ठुबे, पोलिस कर्मचारी रविंद्र चव्हाण यांनी अपघातस्थळी धाव घेतली. रस्त्यालगत असलेला खड्डा खोल असल्याने मृतदेह काढण्यास अडचण आली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने ग्रामस्थांच्या मदतीने आदित्यचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. मृत आदित्यच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.