अंबड (जि. जालना) : चोरट्यांनी एका सराफा व्यापाऱ्याच्या दुकानाच्या भिंतीला पाठीमागून भगदाड पाडत आतमध्ये प्रवेश केला. तिजोरीचा लोखंडी दरवाजा गॅस कटरच्या साहाय्याने कापून आतील ८ लाख २७ हजार ६७० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास अंबड शहरातील सराफा मार्केटमध्ये घडली.
अंबड शहरातील शहरात सराफा मार्केटमध्ये मयूर औदुंबर बागडे यांचे सराफा दुकान आहे. चोरट्यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास या दुकानाच्या पाठीमागील भिंतीला भगदाड पाडून आतमध्ये प्रवेश केला. लोखंडी दरवाजा गॅस कटरच्या साहाय्याने कापला. तसेच तिजोरीचा दरवाजाही गॅस कटरने कापून आतील सोन्या-चांदीचे ८ लाख २७ हजार ६७० रुपयांचे दागिने लंपास केले. यात चेन, सोन्याचे पेंडल, चांदीची चेन, कडे, जोडवे आदी दागिन्यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, पोलिस निरीक्षक शिरीष हुंबे, पोलिस निरीक्षक सोमनाथ नरके, पी. एस. आय योगेश चव्हाण, आदिनाथ ढाकणे आदींनी सोमवारी घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणात मयूर बागडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास स. पो. नि सोमनाथ नरके करीत आहेत.
तीन गॅस कटर ताब्यातघटनास्थळाचा पंचनामा करतेवेळी पोलिसांना दुकानाच्या मागील बाजूस दोन मोठे गॅस कटर, एक लहान गॅस सिलिंडर, गॅस कटर, लोखंडी रॉड, दोन लोखंडी गिरमीट, काणस व इतर साहित्य आढळून आले. पोलिसांनी हे साहित्य जप्त केले आहे.
व्यापाऱ्याची सतर्कता, एकजण ताब्यातव्यापारी मयूर बागडे यांना सोमवारी पहाटे जाग आली. त्यांनी दुकानातील सीसीटीव्हीच्या हालचाली मोबाइलवर पाहिल्या. परंतु, सीसीटीव्ही बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ सतर्कता बाळगून पोलिसांना माहिती दिली. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मोहम्मद युसूफ अली हयात आली (रा. लकरी टोला अमनत दिआरा, जि. साहेबगंज) याला ताब्यात घेतले. इतर तिघे मात्र पळून गेले.